निलेश उभाळे यांच्या तक्रारीची दखल घेत, भोजे येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना अखेर रद्द.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०७/२०२२
पाचोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा मोठ्या प्रमाणात होणारा काळाबाजार व स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभारामुळे तसेच पुराव्यानिशी वारंवार तक्रारी करुनही काहीएक कारवाई होत नसल्याने तसेच या भ्रष्टाचाराच्या धंद्यात पुरवठा विभागातील काही अधिकारी व कर्मचारी हे पडद्यामागून या भ्रष्ठाचारी दुकानदारांच्या पाठीशी असल्याकारणाने आजही पाचोरा तालुक्यातील कायदा आमच्याच बापाचा समजून वागणारे स्वस्त धान्य दुकानदार आजही मोठ्या प्रमाणात गोरगरिबांच्या नावावर येणारे धान्य काळ्याबाजारात विकत आहेत.
असाच काहीसा गैरप्रकार पाचोरा तालुक्यातील भोजे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या शासन मान्य स्वस्त धान्य दुकानदात सुरु होता या कारणांमुळे गोरगरिबांच्या वाट्याला येणारे धान्य त्यांना मिळत नसल्याने व त्यांच्या तक्रारीची कोणीही दखल घेत नसल्याने हे गोरगरीब निराश होऊन कुणीतरी आपल्याला मदत करेल व न्याय मिळवून देईल या प्रतीक्षेत होते.
हिच बाब चिंचपुरा येथील उच्चशिक्षित, समाजसेवक व सतत अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढणारे मा. श्री. निलेश उभाळे यांच्या लक्षात आली त्यांनी भोजे, चिंचपुरे गावातील गोरगरिबांच्या संपर्कात जाऊन सविस्तर माहिती जाणून घेत स्वस्त धान्य दुकानदाराच्या गैरकारभाराच्या पुराव्यासह एप्रिल २०२० मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग दिल्ली, उपलोकायुक्त महाराष्ट्र राज्य, प्रधानमंत्री कार्यालय दिल्ली, राष्ट्रपती कार्यालय दिल्ली, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यासह वरिष्ठ कार्यालयांमध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या.
या तक्रारीत भोजे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या शासन मान्य स्वस्त धान्य दुकानदात सेल्समनचा मनमानी व गैरकारभार, दरमहा येणाऱ्या धान्याचे वाटप करतांना लाभधारकांना शासनाच्या नियमाप्रमाणे धान्य वितरित न करणे, धान्य वितरणाच्या पावत्या न देणे, दरमहा आलेल्या धान्य पुरवठ्याची माहिती जनहितार्थ जाहीर न करणे, धान्य दुकानात उपलब्ध असलेल्या मालाची माहिती दर्शनी भागात बोर्डावर लिहीणे क्रमप्राप्त असतांनाही मिळालेला धान्य पुरवठा व वितरित झालेल्या धान्याची माहिती प्रसिद्ध न करणे, लाभार्थ्यांची यादी व भाव फलक न लावणे, शासनाकडून पुरवण्यात आलेल्या धान्याचे नमुने समोर न ठेवणे यासह अनेक मुद्दे उपस्थित केले होते.
या तक्रारीची दखल घेत वरिष्ठ पातळीवरुन चौकशीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सक्षम अधिकाऱ्यांनी भोजे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य दुकानाची कसून चौकशी केली तेव्हा संबंधित स्वस्त धान्य दुकानदात सेल्समनचा मनमानी कारभार, धान्य वितरित करतांना शासनाच्या नियमांची पायमल्ली व अटी, शर्तीचा भंग होत असल्याचे आढळून आल्यामुळे तसेच दुकानाच्या विरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीत व तपासाअंती तथ्य आढळून आल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी मा. श्री. सुनील सुर्यवंशी यांनी जागेवरच आदेश काढून या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येत असल्याचे आदेश दिले आहेत.
या कारवाईमुळे भोजे येथील सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात असून निलेश उभाळे यांनी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी केलेला संघर्ष व झालेली कारवाई याबद्दल निलेश उभाळे यांचे जनतेतून अभिनंदन केले जात आहे. तसेच सत्य परिस्थिती जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांनी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता सरळ, सरळ कारवाई केली याबद्दल निलेश उभाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.
महत्वाचे ~ अजूनही पाचोरा तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदात मोठ्या प्रमाणात मनमानी कारभार व भ्रष्टाचार सुरु असून गोरगरिबांच्या वाट्यावर येणारे धान्य पुर्णपणे वाटप न होता काळ्या बाजारात विकले जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तरी अशा दुकानांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.