पहुर पोलीसांची पाळधी शिवारातील दारुच्या अड्ड्यावर धाड, बाराशे लीटर रसायन व साधनसामग्री केली नष्ट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०४/२०२४
जामनेर तालुक्यातील पहुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाळधी शिवारातील वाघुर नदीकाठी सुरु असलेल्या अवैध गावठी दारुच्या हातभट्टी वर पहुर पोलीसांनी धाड टाकून १२०० लिटर कच्चे रसायन व दारु निर्मितीसाठी आवश्यक असलेले साहित्य जाळून नष्ट केले आहे. पहुर पोलीसांनी केलेल्या या कारवाईमुळे पाळधी परिसरातील अवैध दारु निर्मिती व विक्री करणारांचे धाबे दणाणले असून पहुर पोलीसांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता अवैध धंद्याच्या विरोधात सातत्य ठेऊन हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी करत महाला वर्ग व सुज्ञ नागरिकांनी पहुर पोलीसांचे आभार मानले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पहुर पोलीस स्टेनशचे पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. महेश्वर रेड्डी साहेब व पाचोराचे डी. वाय. एस. पी. मा. श्री. धनंजय वेरुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप, उपनिरीक्षक निरीक्षक सुस्ते, पोलीस कॉन्स्टेबल ढाकरे, गोपाल गायकवाड, राहुल पाटील व हेमंत सोनवणे यांच्या पथकाने पाळधी शिवारातील वाघुर नदीकाठी ईश्वर झिपरु भोई व कैलास झिपरु भोई यांच्या गावठी हातभट्टीवर धाड टाकून याठिकाणी प्लॅस्टिकच्या टाकीमध्ये आढळून आलेले दारु पाडण्यासाठी लागणारे १२०० लिटर कच्चे रसायन व इतर साहित्याची तोडफोड करत ते जाळून नष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पहुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले असून सर्वसामान्य नागरिक व महिलांनी समाधान व्यक्त केले आहे.