निपाणे प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास मनसे तीव्र आंदोलन करणार. मनसे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांचा इशारा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०९/२०२२
पाचोरा तालुक्यातील निपाणे गावात मानवतेला काळिमा फासणारी घटना लोकप्रतिनिधी यांच्या हातून घडल्याने समाजमन सुन्न झाले आहे. अशा समाजकंटक लोकप्रतिनिधीचा व घडलेल्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत असुन संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात येवुन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करु अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष मा. श्री. अनिल वाघ यांनी पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहात आज दिनांक १७ सप्टेंबर २०२२ शनिवार रोजी दुपारी ३ वाजता पाचोरा येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.
यावेळी पाचोरा तालुका अध्यक्ष शुभम पाटील, भडगाव तालुका अध्यक्ष सागर पाटील, शहर अध्यक्ष रुषीकेष भोई, शहर संघटक हर्षल अहिरे, उप शहर अध्यक्ष यश रोकडे, ज्ञानेश्वर ठाकरे, शहर सरचिटणीस श्रीकृष्ण दुंदुले, प्रशांत पाटील, गोपाल नाईक, दिपक ठाकरे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रविवार रोजी सुरत येथे मृत्यू झालेल्या पाचोरा तालुक्यातील निपाणे येथील निलाबाई वामन धनुर्धर या ६७ वर्षाच्या आजीचे निधन झाले. मयत निलाबाई वामन धनुर्धर यांचे गाव हे पाचोरा तालुक्यात निपाणे असल्याकारणाने त्यांचा अंत्यविधी निपाणे येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला सुरत येथून मृतदेह रात्री उशिरा आल्यामुळे अंत्यविधीसाठी रात्री साडेदहा वाजले होते याच वेळी जोरदार पाऊस सुरु झाला यामुळे उघड्यावर अंतिम संस्कार करणे शक्य नसल्याने जिल्हापरिषद मार्फत बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी तयारी सुरु असतांनाच आमच्या स्मशानभूमीत तुम्ही अंत्यविधी करु शकत नाही म्हणून तुम्ही येथे अंत्यविधी करु नका असे सांगत काही लोकांनी विरोध केला.
विशेष शरमेची बाब म्हणजे या विरोध करणारा मध्ये माजी जिल्हापरिषद सदस्य तथा शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनोहर गिरधर पाटील (रावसाहेब पाटील) व निपाणे गावाचे प्रथम नागरिक सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांचा यात पुढाकार असल्याचे दिसून आले. हा विरोध पाहून मयत निलाबाई धनुर्धर यांच्या नातेवाईकांनी हातापाया पडून विनवण्या केल्यावरही विरोधकांनी नकार देत त्यांची भुमिका कायम ठेवली म्हणून सरतेशेवटी निलाबाई यांच्या पार्थिवावर स्मशानभूमी बाहेर भर पावसात अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वताला प्रतिष्ठित समजून घेणाऱ्या दळभद्री राजकारण्यांमुळे आजही जातीयवादी विचारांची पिल्लावळ सक्रिय असल्याचे दिसून आले आहे असे मत या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आले.
या घटनेचा गावात, तालुक्यात किंवा फक्त जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात निषेध केला जात असून अशा जातीयवादी विचारांच्या ११ लोकांवर पाचोरा पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र संबंधित आरोपी गाव परिसरात आजही उजळमाथ्याने फिरत आहेत तर काही आरोपी मंत्रालयात राजरोसपणे मंत्र्यांची भेट घेतांनाचे छायाचित्र सोशल मीडियावर फिरतांना दिसून येते आहेत. तरीही त्यांना अद्यापपर्यंत अटक करण्यात येत नसल्याने या घटनेतील आरोपींना पाचोरा, भडगाव तालुक्याचे सत्ताधारी आमदार व शिंदे गट यांना पूर्णपणे पाठीशी घालत असल्याचा आरोप व शंका फिर्यादी पक्षाने उपस्थित केली असून मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी पाचोरा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत फिर्यादी पक्षाने केलेल्या आरोपांना पाठींबा देत आरोपींना वाचवण्यासाठी सत्तेतील काही लोक यात सक्रिय असल्याची शंका उपस्थित करत संबंधित आरोपींना येत्या आठ दिवसांच्या आत अटक न झाल्यास मनसे पाचोरा पोलीस स्टेशन समोर उपोषणाला करणार असल्याचा इशारा दिला आहे.