साधा ग्रामपंचायत सदस्य नसलेला माणूस मुख्यमंत्री होणे महाराष्ट्रासाठी दुर्दैव, उध्दव ठाकरेंवर आमदार किशोर पाटील यांचा घणाघात.

सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~०६/०९/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथे आज सकाळी ११ वाजता कुऱ्हाड लोहार गटाचा शिवसेना युवा सेनेचा (शिंदे गट) कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसेच बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन आमदार किशोर पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुकाप्रमुख सुनील पाटील, उपतालुकाप्रमुख भैय्यासाहेब पाटील,कुऱ्हाड लोहारा गट विभाग प्रमुख तानाजी पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी पाटील यांनी केले अध्यक्षीय भाषणात आमदार किशोर पाटील म्हणाले की उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुख्यमंत्री असतांना शिवसेनेच्या आमदारांवर निधी वाटप संदर्भात अन्याय होत होता. राष्ट्रवादी व काँग्रेसचे आमदारांना ३३% निधी जास्त दिला जात होता व शिवसेनेचे आमदारांना फक्त १६% निधी वितरित केला जायचा यामुळे मतदार संघातील लोकांची विकास कामे होत नव्हते असा आरोप करीत ते पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील जनतेची विविध कामे लवकरात लवकर होण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या ४० आमदार व बारा खासदारांनी भाजपशी युती करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे.
यामुळे आता राज्यातील उर्वरित अडीच वर्षात अनेक विकास कामे होतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना अडीच वर्षात ८४ कोटीचा निधी लवकर मिळत नसतांना तो आता एका महिन्यात ८४ कोटी रुपयाचा निधी विकास कामांसाठी मंजूर करून आणला असे देखील ते म्हणाले. तसेच या गटातील जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे अपूर्ण असलेला बहुळा नदीजोड प्रकल्प, या अपूर्ण कामासाठी तब्बल ११ कोटी रुपयांची तरतूद केली असून वर्षभरात हे अपूर्ण काम पूर्ण केले जाईल असे देखील त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले.
भविष्यात येणाऱ्या जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या या अग्नी परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हायचे असून तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांनी जिवापाड मेहनत घेऊन आपल्या गटातील उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आव्हान देखील त्यांनी केले. कार्यक्रमात आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थित कोकडी तांडा, अंबे वडगाव येथील असंख्य कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला. कार्यक्रम यशस्वी ते करिता विभाग प्रमुख तानाजी पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख सुनील पाटील, उपतालुकाप्रमुख भैय्यासाहेब पाटील व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.