कुऱ्हाड खुर्द गावात विद्युत ग्राहक कोमात तर विद्युत चोरी करणारे जोमात, विद्युत वितरण कंपनीचा मनमानी कारभार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०९/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द गावात अधिकृत विद्युत ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून विद्युत वितरण कंपनीकडून आकारले जाणारे आवाजावी बिल पाहून सर्वसामान्य विद्युत ग्राहकांवर डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे विद्युत वाहिनीच्या तारांवर आकोडे टाकून विद्युत चोरांची चंगळ सुरु असल्याचे चित्र डोळ्यासमोर दिसत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की एका बाजूला कुऱ्हाड बुद्रुक गावत मागील आठवड्यात विद्युत वितरण कंपनीकडून सक्तीने बिल वसूल करण्यात आली आहे. ही बिल वसूल करणे योग्य आहे परंतु दुसरीकडे विद्युत वाहिनीच्या तारांवर आकोडे टाकून दिवसाढवळ्या विद्युत चोरी सुरु असून ही विद्युत चोरी विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. परंतु यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई न करता तोंडी सुचना देऊन सोडून देण्यात येत असल्याने अधिकारी व कर्मचारी निघून गेल्यावर हे विद्युत चोरी करणारे पुन्हा आकोडे टाकून दिवसाढवळ्या विद्युत चोरी करतांना दिसून येते आहेत.
(विद्युत वितरण कंपनीची मनमानी विद्युत ग्राहकांच्या डोळ्यात पाणी)
विशेष म्हणजे विद्युत ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता विद्युत वितरण कंपनीच्या कर्मच्याऱ्यांनी आज सायंकाळी वीजबिल कमी येत असल्याची सबब पूढे करून कुऱ्हाड येथील देशमुख गल्लीतील काही अधिकृत विद्युत ग्राहकांच्या घरातील विद्युत मीटर काढून नेल्यामुळे आज या शेतकरी कुटुंबातील विद्युत ग्राहकांना शेतातून थकुन, भागुन आल्यानंतर अंधारात रहावे लागत आहे. विशेष म्हणजे निळे रॉकेल बंद झाल्यापासून कोणत्याही घरात कंदील किंवा दिवा (चिमणी) नसल्याने व खेडेगावातील दुकानातून मेणबत्ती मिळत नसल्याने या कुटुंबातील सदस्यांना अंधारातच स्वयंपाक, जेवण व आपले दैनंदिन दिवस काढावे लागत आहेत.
तसेच सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाचे पाणी व सांडपाण्याच्या गटारी यांच्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली असल्याने रात्रभर जागून डासांपासून बचाव करावा लागत आहे. पावसाळी दिवस असल्याने व खेडेगावातील घराच्या जवळच शेत जमीन असल्याने या दिवसात साप, विंचू, काटे मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने व घराघरात अंधार झाल्याने थोरा, मोठ्यांसह लहान, लहान मुलाबाळांना झोप घेणे मुश्किल झाले असून अनेक आजारांना सामोरे जावे लागणार आहे.
(विद्युत वितरण कंपनीच्या कर्मच्याऱ्याची व विद्युत चोरांची हात मिळवणी, विद्युत चोरट्यांकडून हप्ते घेणारा तो कोण ?)
कुऱ्हाड गावातील महादेव मंदिर व इतर परिसरात विद्युत वाहिनीच्या तारांवर आकोडे टाकून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी सुरु असल्याचे दिसून येत असून या विद्युत चोरांकडुन कुणीतरी हप्ते वसूल करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विशेष म्हणजे विद्युत चोरी पकडण्यासाठी अधिकारी कधी येणार आहेत याबाबतची माहिती संबंधित हप्ते घेणारा व्यक्ती विद्युत चोरांना अगोदरच देत असल्याने विद्युत चोरांवर कारवाईत अडथळा येत आहे. किंवा अचानकपणे अधिकारी आलेच तर आम्ही मारल्यासारखे करु तुम्ही रडल्यासारखे करा असा देखावा करुन एकप्रकारे विद्युत चोरट्यांची पाठराखण केली जात असल्याचे दिसून येत आहे.