कुऱ्हाड खुर्द येथील वार्ड क्रमांक पाच मध्ये अतिक्रणाचा कहर नईम सलीम यांचा उपोषणाचा इशारा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०९/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील वार्ड क्रमांक पाच मध्ये दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच असून काही रहिवाशांनी तर वापराच्या रस्त्यावर पत्राचे शेड उभारुन तारांचे कुंपण करत वहिवाटी रस्त्या बंद केला असल्याने या भागातील वहिवाट पूर्णपणे बंद झाली असल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील वार्ड क्रमांक पाच मधील काही रहिवाश्यांनी भररस्त्यावर शौचालये बांधली असून या शौचालयाचे पाणी सांडपाण्याच्या गटारीत सोडले आहे. तर काहींनी शौचालयाचे मल मिश्रीत पाणी भररस्त्यावर सोडले असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच काही ग्रामस्थांनी सांडपाण्याच्या गटारी वर अतिक्रमण केल्याने त्या गटारी बंद झाल्या असल्याने सांडपाणी वाहून न जाता ठिकठिकाणी डबके साचले आहेत. यामुळे या परिसरात दुर्गंधी व डासांचा उपद्रव होत आहे. याबाबत वार्ड क्रमांक एक येथील रहिवासी नईम सलीम हवालदार यांनी मागील एक वर्षापासून हे अतिक्रमण काढून टाकण्यासाठी कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी पाचोरा यांच्याकडे वारंवार अर्जफाटे व तक्रार दाखल करुनही काहीएक फायदा होत नसल्याने येत्या पंधरा दिवसांत हे अतिक्रमण न काढल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती सत्यजित न्यूजला दिली आहे.
कारण नईम हवालदार यांनी सांगितलेल्या माहितीनुसार कुऱ्हाड खुर्द येथील वार्ड क्रमांक पाच मध्ये जमील मोहम्मद, गुलाब सुभान, भिकन अब्दुल, शकिल उस्मान, हमीद उस्मान, हकीम अब्दुल रेहमान, हैदर देवदत्त, शौकत सुभान यांनी अतिक्रमण करून सांडपाण्याच्या गटारी बुजवून तसेच रस्त्यावर पत्र्याचे शेड उभारले आहे. यामुळे या परिसरातील सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जात नसल्याने या परिसरात मोठमोठे डबके साचले आहेत. या डबक्यात डास, मच्छर मोठ्या प्रमाणात असल्याने व दुर्गंधी येत असल्याने आमच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. मागील महिन्यात माझ्या मुलाला दवाखान्यात चाळीस हजार रुपये खर्च आला असल्याचे सांगत येत्या पंधरा दिवसांत जर का ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढले नाही तर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले आहे.
लवकरच अतिक्रमण काढणार ~ सरपंच मा. श्री. कैलास भगत.
नईम शेख याचा तक्रारी अर्ज मिळाला असून अतिक्रमण काढण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरु केले असल्याचे सांगत लवकर अतिक्रमण काढण्यात येईल असे कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच मा. श्री. कैलास भगत यांनी सांगितले.