विनयभंग झालेल्या पिडीत तरुणीने संतापातून केला आत्महत्येचा प्रयत्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०२/२०२२
सद्यपरिस्थिती सगळीकडेच स्वैराचार वाढल्याचे लक्षात येत आहे. कारण मागील महिन्यात जळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुलींचे अपहरण, विनयभंग, बलात्कार, अत्याचार करुन खुन तसेच सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. या घटना थांबता थांबत नसुन हे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. असाच एक छेडखानीचा प्रकार पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावात घडला असून या घटनेत अपमानित झालेल्या अल्पवयीन मुलीने संतापाच्या भरात पिकावरील फवारणीचे कोणतेतरी विषारी औषध सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावात एक अल्पवयीन तरुणी स्वताच्या घरून गावातीलच काकांच्या घरी जात असतांंना तिच्या मागून सायकलवर येऊन एका तरुणाने त्या अल्पवयीन मुलीची खांद्यावरील ओढणी ओढून अश्लील हावभाव करत शाब्दिक खेळी केली व खांद्यावरील ओढणी ओढून नेत पुढे जाऊन रस्त्यावर फेकून दिली या घटनेचा सदर अल्पवयीन मुलीस मनस्ताप झाला ही घटना तिने घरच्यांना सांगितल्यानंतर तीच्या कुटुंबियांनी सामंजस्याची भूमिका घेत त्या तरुणाला थोडाफार प्रसाद देऊन त्याला समज देऊन सोडून दिले.
परंतु सदरील तरुणीला घडलेल्या घटनेमुळे आपली बदनामी झाली असा समज होऊन मनस्ताप झाला. या प्रसंगामुळे नैराश्यातून सदर तरुणीने दुसऱ्या दिवशी पिकावर फवारणीचे कोणतेतरी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब गल्लीत राहाणाऱ्या शेजारील महिलेच्या लक्षात येताच या महिलेने शेतात गेलेल्या तीच्या कुटुंबियांना ही माहिती कळवली त्यांनी घरी येऊन लगेचच खाजगी वाहनातून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. ही बाब वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला कळवल्यावर तसेच तरुणीच्या जबाबावरुन सद्दाम अब्दुल पिंजारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची दखल घेत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. महेंद्र वाघमारे पुढील तपास करीत आहेत.