वरखेडी येथे घरफोडी, सुनील पांडे यांच्या घरावर चोरांनी मारला डल्ला.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/१२/२०२१
(सी.सी.टी.व्ही.फुटेजमध्ये चोर सापडण्याची शक्यता.)
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे आज सकाळी घरफोडी झाल्याचा प्रकार उघड झाला असून यात अंदाजे काही रोख रक्कम सोन्याचे दागिने चोरी गेले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परंतु घरमालक घरी आल्यानंतरच किती ऐवज गेला आहे हे निश्चित कळेल.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वरखेडी येथील रहिवासी सुनील प्रेमचंद पांडे यांचे राम मंदिराजवळ घर आहे. सुनील पांडे यांचा पुतण्या राहुल अनिल पांडे यांचा विवाह असल्याने घरात पाहुण्यांची वर्दळ होती. याच धामधुमीत मुलाचे लग्न असल्याने राहुल या नवरदेवा सह वऱ्हाडी मंडळी, नातेवाईक दुपारी दोन वाजता सोलापूर येथे लग्न सोहळा पार पाडण्यासाठी निघून गेले होते.
घरी काही मोजक्याच महिला व पुरुष मंडळी होती. घरी असलेल्या काही महिला व पुरुष मंडळींनी सोमवारी सायंकाळी आपल्या नित्य रितीरिवाजा प्रमाणे जेवण वगैरे आटपून सहज विरंगुळा म्हणून महिलांनी संस्कृती जपत लग्नसोहळ्यात म्हटली जाणारी गाणी म्हणत रात्री अंदाजे ११ वाजेपर्यंत जागरण केले. तसेच करमणुकीसाठी इतरही कार्यक्रम झाले. नंतर सुमारे अकरा वाजेच्या सुमारास सुनील पांडे यांचे बंधू अनिल पांडे यांच्या दुसऱ्या घरी संपूर्ण मंडळी झोपण्यास गेले होते.
सकाळी अनिल पांडे यांच्या घरी झोपलेली मंडळी सकाळी सुनील प्रेमचंद पांडे यांच्या राम मंदिराजवळ असलेल्या घरी गेले असता त्यांना त्या ठिकाणी घरफोडी झाल्याचे लक्षात आले. घरातील गोदरेज कपाट उघडलेले दिसून आले तसेच साहित्य व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच इनव्हेटरची बॅटरी चोरीला गेल्याचे लक्षात आले. ही बाब लक्षात येताच त्यांनी हा प्रकार घरातील काही पुरुष मंडळी व गावकऱ्यांना सांगितला चोरी झाल्याची वार्ता गावभर पसरली.
ही घटना पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला माहित पडताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पुढील तपास सुरू आहे. असून श्वान पथकाला पाचारण करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
मागील महिन्यापासून वरखेडी व आसपासच्या गावात लहान मोठ्या चोऱ्यांचे प्रकार सुरू असून दोन दिवसापूर्वीच लोहारी पाचोरा दरम्यान सपना हॉटेल जवळ दुचाकीस्वाराला डोळ्यात मिरची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न झाला होता. तसेच आता लगेचच वरखेडी परिसरात पांडे यांचे घरी चोरी झाल्याने वरखेडी, लोहारी, सावखेडा, लासुरे, आर्वे, सांगवी, कुऱ्हाड, या गावातील जनतेतून भीतीयुक्त वातावरण तयार झाले आहे.