पाचोरा पुरवठा विभागात दलालांचा उच्छाद व धान्य वाटपात घोळ. समाजसेवक मा.श्री.अरुण पवार यांची तक्रार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०५/२०२२
पाचोरा तालुक्यात पुरवठा विभागात मोठ्या प्रमाणात घोळ सुरु असुन यात ऑनलाईन कामे करतांना वेगवेगळी कारणे सांगून गोरगरीब जनतेचे हाल केले जातात. तसेच रेशनकार्ड विभक्त करणे, नावात बदल करणे, नवीन नावांचा समावेश करणे, नावे कमी करणे, नवीन रेशनकार्ड बनवणे अशी अनेक कामे त्वरित होत नसून सर्व्हर डाऊन आहे, लोड घेत नाही, उद्या या पर्वा या अशा सबबी सांगण्यात येतात.
मात्र दुसरीकडे याच कार्यालयात काही मर्जीतील लोकांची कामे हातोहात, रातोरात होतात. तसेच रेशनिंग वाटपात मोठा घोळ असून आमचा बंजारा समाज मागील तीन ते चार महिन्यांपासून ऊसतोडीसाठी गेला होता. तरीही गावागावांतील रेशनिंग दुकानदारांनी खोटे, नाटे रेकार्ड करुन या बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या नावावर येणारे धान्य वितरित केल्याचे खोटे रेकार्ड तयार करून हा गोरगरिबांच्या हिस्सयाचा गहू, तांदूळ काळ्या बाजारात विकला असा आरोप अंबे वडगाव येथील बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. अरुण पवार यांनी केला असून या पुरवठा विभागाची संपूर्ण चौकशी होऊन यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.