जे नाही ललाटी, ते देतो तलाठी. मयत व्यक्तीची जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याने शेंदुर्णी येथील तलाठी सर्कल व इतर दोन व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.
![](https://satyajeetnews.com/wp-content/uploads/2024/03/featured-image-1.jpg)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०५/२०२२
जे नाही ललाटी, ते देतो तलाठी अशी एक म्हण प्रचलित आहे. व याच म्हणीप्रमाणे एक घटना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात घडली असून या घटनेत एका मयत व्यक्तीची जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याने शेंदुर्णी येथील तलाठी सर्कल व इतर दोन व्यक्तींविरुद्ध पहुर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शेंदुर्णी गावातील वाडी दरवाजा परिसरात राहणाऱ्या शेतकरी महिला श्रीमती जिजाबाई देविदास माळी वय ५५ वर्ष यांचे पती देवीदास गोविंदा माळी यांचे दिनांक २८ एप्रिल २०२१ रोजी दिर्घ आजारामुळे निधन झाले होते. पतीचे निधन झाल्यानंतर श्रीमती जिजाबाई माळी या दुख्खाच्या सावटाखाली होत्या त्यामुळे त्यांची मनस्थिती ठिकाणावर नसल्याने त्या घरातच बसून होत्या काही दिवसांनंतर श्रीमती जिजाबाई माळी यांनी ह्रदयावर दगड ठेवून स्वतासाठी नव्हे तर मुलासाठी आपल्याला पुढील आयुष्य जगावेच लागेल हा निश्चय करुन भविष्यातील व्यवहार बघण्यासाठी त्यांनी पतीच्या नावे असलेली शेतजमीन गट नंबर ११५९ या उताऱ्यावर स्वताचे नाव लावून लहान मुलाला वारस लावण्यासाठी शेंदुर्णी येथील तलाठी कार्यालय गाठले व तेथे कार्यरत असलेले तलाठी शांतीलाल मोरसिंग नाईक यांना भेटून शेतजमीनीच्या उताऱ्यावर माझे नाव लावून माझ्या लहान मुलाला वारस लावण्यासाठी सांगितले मात्र तलाठी शांतीलाल मोरसिंग नाईक या तलाठी आप्पांनी अगोदरच शेण खाऊन मयताचे नावे असलेली शेतजमीन दुसऱ्याच्या नावे करुन दिली असल्याकारणाने श्रीमती जिजाबाई माळी यांच्या भोळे पणाचा व अडाणी पणाचा फायदा घेऊन तुमच्या शेतजमीनीचा वाद न्यायालयात सुरु असल्याने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय त्या शेतजमीनीवर तुमचे नाव लावता येणार नाही असे सांगून आपण केलेले पाप झाकण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला.
तलाठी आप्पांनी सांगितलेल्या उत्तरावर श्रीमती जिजाबाई माळी यांचा विश्वास बसला नाही. व त्या दिवसापासून श्रीमती जिजाबाई माळी या चिंतेत होत्या व मनात शंका आल्यामुळे व शेतजमीनीच्या उताऱ्याचे काम असल्याकारणाने श्रीमती जिजाबाई माळी यांनी गावातील ई सेवा केंद्रावर जाऊन मयत पती देविदास माळी यांच्या नावे असलेली शेतजमीन गट नंबर ११५९ चार उतारा ऑनलाईन काढला. उतारा हातात पडल्यानंतर मात्र त्या उताऱ्यावर लागलेली नावे पाहून श्रीमती जिजाबाई माळी यांच्या पायाखालची जमीन सरकली यामागील कारणही तसेच होते.
मयत देविदास माळी यांच्या नावे असलेल्या गट नंबर ११५९ या उताऱ्यावर असलेले एकुण क्षेत्रफळ ०२ हेक्टर ३३ आर इतके होते मात्र या उताऱ्यावर तलाठी शांतीलाल मोरसिंग नाईक यांनी संबंधितांशी हातमिळवणी करुन या एकुण ०२ हेक्टर ३३ आर क्षेत्रापैकी मयत देविदास माळी यांच्या नावे फक्त आणि फक्त ०१ हेक्टर १६ आर जमीन ठेवून उताऱ्यावरील उर्वरित जमीनी पैकी ०१ हेक्टर १७ आर इतके क्षेत्रफळ हे त्यांची आत्या जनाबाई गोविंदा माळी यांच्या नावे करुन देत दिनांक तसा सामाईक शेतजमीन असल्याचा उतारा हातात पडल्यानंतर श्रीमती जिजाबाई माळी व त्यांच्या मुलाच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
याबाबत अधिक माहिती घेतली असता श्रीमती जिजाबाई माळी यांचे पती वारल्यानंतर माझ्या नातेवाईकांनी संबंधित तलाठी शांतीलाल मोरसिंग नाईक याला हाताशी धरुन आर्थिक व्यवहार करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे मयत देविदास माळी यांच्या पत्नी श्रीमती जिजाबाई माळी यांची कोणतीही संमती न घेता तलाठी यांनी उताऱ्यावर दुसऱ्याचे नाव लावल्याची बाब लक्षात येताच त्यांनी आक्रोश भगवान मिळी, आनंदा गजानन माळी यांना याबाबत सविस्तर माहिती दिली व त्यांना सोबत घेऊन शेंदुर्णी येथील नगरपंचायत इमारतीत असलेले तलाठी कार्यालय गाठले व तेथील तलाठी शांतीलाल मोरसिंग नाईक यांना उताऱ्यावर लागलेली नावे याबाबत विचारले असता तलाठी शांतीलाल मोरसिंग नाईक यांनी सांगितले की शेंदुर्णी येथील रहिवासी जनाबाई गोविंदा माळी व एक अनोळखी इसम यांनी शंभर रुपये किंमतीचा स्टॅम्प पेपर व कागदपत्र दिल्यावर मयत देविदास माळी यांच्या नावे असलेली गट नंबर ११५९ एकुण क्षेत्र ०२ हेक्टर ३३ आर पैकी १ हेक्टर १७ आर शेतजमीन ही जनाबाई गोविंदा माळी यांच्या नावे लागली आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर भविष्यात जमीन परस्पर नावे केल्याचा प्रकार उघडकीस येईल व आपल्या हाती आलेली शेतजमीन परत जाईल म्हणून जनाबाई माळी यांनी १८ फेब्रुवारी २०२२ रोजी नुकतीच नावे झालेली ०१ हेक्टर १७ आर शेतजमीन युवराज देवराम माळी यांना विक्री करुन दिल्याचा प्रकार उघडकीस आला म्हणून श्रीमती जिजाबाई माळी यांनी पहुर पोलीस स्टेशनला जाऊन रितसर फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरून पहुर पोलीस स्टेशनला तलाठी व सर्कल यांनी संगनमताने पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून फिर्यादीचे मालकीहक्क असलेली शेत जमिन गट नंबर ११५९ ०२ हेक्टर ३३ आर शेतजमीनी पैकी ०१ हेक्टर १७ आर शेतजमीन बनावट दस्तऐवाज तयार करून मालकीहक्कात अफरातफर करत दुसऱ्याच्या नावे करुन दिली म्हणून शेंदुर्णी येथील तलाठी शांतीलाल मोरसिंग नाईक व मंडलाधिकारी हर्षल विश्वनाथ पाटील यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० सेक्शन ४२०, ४६८, ४७१, ३४ गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रतापराव इंगळे व त्यांचे सहकारी करत आहेत.