वडगाव आंबे गाव परिसरात गावठी दारुच्या थैल्यांचा पाऊस.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०४/२०२४
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथे गाव परिसरात गावठी दारुची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असून ही गावठी दारुची अवैध विक्री गावातील मुख्य रस्त्यावर, भरवस्तीत, धार्मिक स्थळांजवळ तसेच भ्रमणध्वनीवर फोन फिरवा व दारु घरपोच मिळवा अश्या पध्दतीने रात्रंदिवस सुरु आहे. याबाबत वारंवार वृत्त प्रकाशित करुन तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन व दारुबंदी अधिकारी व कर्मचारी पाचोरा, जळगाव यांना खबर देऊनही ठोस कारवाई केली जात नसल्याने गावठी दारुची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
यामुळे अल्पवयीन मुले, तरुण तुर्क व म्हातारे अर्क या गावठी दारुच्या व्यसनाच्या आहारी जात आहेत. यामुळे गाव परिसरात अशांतता निर्माण झाली आहे. आतातर गावठी दारुची अवैध विक्री करणारांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असल्याचा अनुभव येत असून दारुची विक्री केल्यानंतर रिकाम्या कॅरी बॅग म्हणजे दारु व्यवसायिकांच्या भाषेत (पोतरी) भररस्त्यात फेकून देत आहेत.
आज सकाळी दिलीप जैन हे शेताकडे गेले असता त्याच्या गावाजवळील जामनेर ते पाचोरा रस्त्यावर असलेल्या शेतातील बांधावर असलेल्या बाभळीच्या झाडाखाली या गावठी दारुच्या पोतऱ्या दिसून आल्या आहेत. असाच काहीसा प्रकार वडगाव आंबे ते कुऱ्हाड, वडगाव आंबे ते वडगाव आंबे खुर्द वडगाव आंबे ते शेंदुर्णी तसेच वडगाव आंबे ते वरखेडी रस्त्यावर दिसून येत आहे. या रस्त्यावर टाकलेल्या गावठी दारुच्या रिकाम्या थैल्या गुराढोरांच्या खाण्यात येत असून यामुळे गुराढोरांना पोटफुगी (फॉरेन बॉडी) सारख्या आजाराला सामोरे जावे लागत असल्याने पशुधन पालकांची लाखो रुपये किंमतीची पाळीव जनावरे मृत्युमुखी पडतात.
आता वडगाव आंबे येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. अंबिका मातेचा यात्रोत्सव येत्या नऊ तारखेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे. या यात्रेत शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी वडगाव आंबे येथील गावठी दारुची विक्री कायमस्वरूपी बंद करवी अशी मागणी केली जात आहे.