राजुरी (वाणेगाव) धरण परिसरात केबल वायर चोरट्याला शेतकऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०४/२०२२
पाचोरा तालुक्यात रब्बी हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून रब्बी पिकांना पाणी भरण्यासाठी लोडशेडींगचा सामना करत कधी रात्री तर कधी दिवसा जसा विद्यूत पूरवठा मिळेल त्या पध्दतीने राब, राब राबून शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी धडपडत असतांनाच दुसरीकडे लोडशेडींचा फायदा घेत रात्रीच्या वेळी केबल वायर चोरी करणाऱ्या चोरट्यांनी डांभुर्णी, पिंप्री, वाणेगाव, कोल्हे व इतर शिवारातील व धरण परिसरातील विद्यूत पंपाच्या केबल वायर चोरी करुन शेतकऱ्यांचे हजारो रुपये नुकसान केल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस गोपनीय पद्धतीने या गुन्ह्याचा तपास करत असतांनाच आज दिनांक २५ एप्रिल २०२२ सोमवार रोजी काही शेतकरी रात्री अंदाजे साडेआठ वाजेच्यासूमारास आपल्या शेताकडे गस्त घालण्यासाठी गेले असता राजुरी (वाणेगाव) धरण परिसरात अंधारात एक व्यक्ती दिसून आला त्याच्या हालचालींवर नजर ठेवून पाहीले असता संशयास्पद हालचाली दिसून आल्यामुळे शेतकऱ्यांनी त्याला आवाज दिला असता त्याने पळुन जाण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्याच्या जवळ स्वयंचलित दुचाकी असल्याने त्याला लगेचच पळता आले नाही. याच संधीचा फायदा घेत शेतकऱ्यांनी चपळाईने त्याला त्याच्या ताब्यातील एक्सल कंपनीची स्वयंचलित दुचाकी, नुकत्याच कापलेल्या केबल वायर व वायर कापण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह रंगेहाथ पकडून पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला घेऊन गेले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
हा केबल वायर चोरटा वरखेडी जवळील भोकरी येथील असल्याचे बोलले जात असून तो रंगेहाथ सापडला असल्याने या चोरट्याने आजपर्यंत कोणकोणत्या शेत शिवारातील किंवा धरण परिसरातील केबल वायरिंची चोरी केली आहे, चोरी केली असल्यास या चोरुन नेलेल्या केबल वायर कुणाला विकल्या किंवा चोरलेल्या केबल वायर कुठे आहेत तसेच कुणाला विकल्या आहेत. याचा तपास होऊन चोरीच्या केबल वायर घेणारालाही आरोपी करण्यात यावे, त्याचा भ्रमणध्वनी तपासण्यात यावा व या संशयित आरोपीसोबत अजून कोण, कोण सामील आहे हा तपास करण्यात यावा अशी मागणी डांभुर्णी, पिंपरी, सावखेडा, वाणेगाव, राजुरी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
सद्यस्थितीत संशयित इसम पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांच्या ताब्यात असल्याचे समजले असून सविस्तर वृत्त उद्या सकाळी.