सोयाबीन या पिकासाठी पिक विमा नसल्याने शेतकरी हवालदिल, उद्या शिवसेनेकडून तहसीलदारांना निवेदन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७//०७/२०२२
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना अमलात आणली आहे. या योजनेत ज्वारी, मका, भुईमूग, मुंग, उडीद, कापूस, तुर, बाजरी, तीळ या पिंकाचा समावेश आहे. परंतु जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत जवळपास २५ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. विशेष म्हणजे हे सोयाबीन पिक घेणारे शेतकरी हे अल्पभूधारक, हलक्या जमीन तसेच कापूस किंवा इतर पिके घेण्यासाठी लागणारा खर्च करण्याची ऐपत नसल्याने त्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केली आहे.
हे सोयाबीन लागवड केलेले शेतकरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून ते ई सेवा केंद्रावर जाऊन पिक विमा भरण्यासाठी इ सेवा केंद्र संचालकांकडे रितसर पैसे भरण्यासाठी तयार आहेत. परंतु इ सेवा केंद्रावर गेल्यानंतर पंतप्रधान पिक विमा योजनेची वेबसाईट उघडल्यानंतर जो फार्म भरायचा आहे. त्या फार्मावर पाचोरा तालुक्यासाठी सोयाबीन पिकाची नोंद नसल्याने सोयाबीन पिक घेणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हिच समस्या लक्षात घेऊन पाचोरा तालुक्यातील सोयाबीन पिकाला पिक विमा योजनेत समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ॲडव्होकेट मा. श्री. अभय पाटील व बाफणा कृषी व विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रमेशचंद्रजी बाफना हे उद्या पाचोरा तहसीलदार यांना निवेदन देऊन सोयाबीन पिक पिक विमा योजनेत समाविष्ट करावे अशी मागणी करणार आहेत. तरी तालुक्यातील जास्तीत, जास्त शेतकऱ्यांनी उद्या सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय पाचोरा येथे हजर रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.