शाळा, कॉलेज सुरु होवूनही एस.टी. बससेवा बंद असल्याने विद्यार्थी हतबल. पुर्ण प्रवासभाडे घ्या पण बस सुरु करा..
(एस.टी.सेवा बंद असल्याने भररस्त्यात खाजगी वाहनांची वाट बघत उभ्या असलेल्या कळमसरा येथील विद्यार्थ्यांनी)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०२/२०२२
मागील वर्षांपासून कोरोणाची लागण झाल्यापासून शाळा, कॉलेज सोबतच एस.टी. बस प्रवासी सेवाही बंद होती. परंतु आता कोरोणा या आजाराचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. म्हणून दैनंदिन व्यवहार हळूहळू सुरळीत होत आहेत. सोबतच शाळा, कॉलेज व सर्व शैक्षणिक संस्था सुरु करण्यात आल्या असून विद्यार्थीवर्ग एक वर्षापासूनची मरगळ झटकून मोठ्या उत्साहात शाळेत जाऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस एक करत आहे.
परंतु खेडेगावात उच्च शिक्षणाची व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागातील शंभर टक्के मुलामुलींना शिक्षणासाठी बाहेर गावी जावे लागते आहे. आधीच कोरोणा काळात शाळा, कॉलेज बंद होत्या यात विद्यार्थ्यांचे बरेच शैक्षणिक नुकसान झाले आहे. व आता जवळपास मागील तीन महिन्यापासून गरिबांची लालपरी म्हणून ओळख असलेली एस.टी. बस सेवेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला असल्याने गावागावात एस.टी.बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये वेळेवर जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. सोबतच आता लग्नसराईच्या हंगामात व इतर दैनंदिन कामासाठी खेडेगावातील लोकांना मजबुरीने खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मदतीने जीव धोक्यात टाकून दामदुप्पट प्रवासभाडे देऊन आपली दैनंदिन कामे पूर्ण करावी लागत आहे.
*************************************
एस.टी.सेवा बंद असल्याचा सगळ्यात जास्त फटका विद्यार्थ्यांना बसत असून विशेषकरून विद्यार्थीनींना खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवास करणे त्रासदायक व जीवघेणे ठरत आहे. तसेच मागील काळात शाळा, कॉलेज बंद असल्याने ऑनलाईन अभ्यासक्रम घेतांना बऱ्याचशा अडचणी आल्याने व्यवस्थित अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. त्यातल्यात्यात मार्च व एप्रिल महिन्यात परिक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे. म्हणून विद्यार्थीवर्ग घोकंपट्टी करुन अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी धडपडत असतांनाच एस.टी. बसेस बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थीवर्ग शाळा, कॉलेजमध्ये वेळेवर जाता येत नसल्याने त्यांच्या अविभ्यासिका बुडत आहेत.
यात पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर, कळमसरा, लोहारा, कुऱ्हाड, वरखेडी, शिंदाड, गोंदेगाव, नगरदेवळा या मोठ्या लोकसंख्येच्या गावांसह इतर लहानमोठ्या गावातील विद्यार्थीसंख्या मोठ्या प्रमाणात असून यांना जीवावर खेळुन खाजगी वाहनातून जास्तीचे भाडे देऊन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. म्हणून गाव, खेड्यातील विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजमध्ये वेळेवर जाण्यासाठी व परत घरी येण्यासाठी शाळेच्या वेळेनुसार पूर्वीप्रमाणे एस.टी.बससेवा तसेच गरिबांची गीतांजली पाचोरा ते जामनेर (पी.जे.) रेल्वे त्वरित सुरु करावी अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा हजारो विद्यार्थी व पालकवर्गाकडून देण्यात आला आहे.