कोल्हे येथील आरोग्य वर्धिनी उपकेंद्राच्या बांधकामाला अतिक्रणचा खोडा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील कोल्हे गावासाठी आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचे बांधकाम सुरु असून जवळपास पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु या दवाखान्याच्या सरंक्षण भिंतीचे काम पूर्ण करण्यासाठी एका इसमाने अतिक्रमण केलेल्या पत्र्याच्या शेडमुळे अडथळा आला आहे. तरी हे अतिक्रमण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्वरीत काढण्यात यावे अशी मागणी होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कोल्हे येथे आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचे बांधकाम सुरु आहे. या उपकेंद्रासाठी ग्रामपंचायतीने २२ गुंठे जागा दिलेली आहे. नेमके याच ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर एका इसमाने अतिक्रमण करुन एक पत्र्याचे शेड उभारले आहे. नेमके या अतिक्रमण केलेल्या शेडमुळे दवाखान्याच्या सरंक्षण भिंतीचे बांधकाम करण्यासाठी अडथळा निर्माण झाला असून संबंधित अतिक्रमण धारक त्या जागेवरील ताबा सोडण्यासाठी तयार नसल्याचे समजते. म्हणून ग्रामपंचायतीने हे अतिक्रमण काढून बांधकामात येणारा अडथळा त्वरीत दुर करावा अशी मागणी सुज्ञनागरीक व ठेकेदाराने केली आहे.