वरखेडी येथील बजरंग दल कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने कत्तलीसाठी जाणाऱ्या ३ गाई व १ गोऱ्ह्याचे वाचविले प्राण.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/१२/२०२१
जळगाव जिल्ह्यात मागील महिन्यापासून शेती कामासाठी चालतील असे सुदृढ बैल, गोऱ्हे (वासरु), दुभत्या गायी ही जनावरे कत्तल करण्यासाठी नेण्याचे प्रमाण वाढले आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे जळगाव जिल्ह्यात याच आठवड्यात ठिकठिकाणी कत्तलीसाठी गुरे वाहून नेतांना बजरंग दल कार्यकर्ते व पशुप्रेमी लोकांनी गाड्या अडवून शहानिशा करत रितसर गुन्हे दाखल करत गुराढोरांचे जीव वाचवले आहेत.
एका बाजूला कारवाया होत असल्यातरी गुरांची कत्तल सुरुच असल्याने कत्तलखान्यात गुरे नेली जात आहेत.या कारणांमुळे जातिवंत जनावरे झपाट्याने कमी होत असून भविष्यात भावी पिढीला दूध पिण्यासाठी उपलब्ध असेल की नाही, तसेच गाय, म्हैस, बैल या प्राण्यांची ओळख चित्रातून करुन द्यावी लागेल का ? अशी भीती निर्माण झाली आहे.
अशाच प्रकारे गुराढोरांची चोरटी वाहतूक करुन कत्तलीसाठी नेत असतांनाच दिनांक २९ डिसेंबर बुधवार रोजी वरखेडी येथून शेंदूर्णीकडे जाणारी छोटा हत्ती स्वरूपाची गाडी ही वरखेडी, शेंदुर्णी रस्त्याच्या कडेला वरखेडी येथे उभी होती. वरखेडी येथील स्थानिक बजरंग दल कार्यकर्त्यांना संशय आल्याने त्यांनी बघितले असता त्यांना गाडीच्या मागील भागात दाटी, दाटीने अडचणीचे जागी मान तोंड दोरीने बांधून प्राण्यांचा छळ होईल असे व अमानुषपणे गुरांची वाहतूक होतांना दिसून आले. म्हणून संशय बळावला कारण अशा प्रकारे वाहतूक करण्याचा परवाना नसतांना अवैधरित्या निदर्यतेने कोंबून कत्तलीसाठी वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले.
म्हणून बजरंग दल कार्यकर्त्यांनी गाडीच्या ड्राईव्हरला विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तर दिल्यानंतर बजरंग दल कार्यकर्त्यांना शंका आल्यावर योगेश अशोक चौधरी यांनी लोहारा येथील हेमंत गुरव यांना फोन वरून सगळ्या घटनेची माहिती दिली. गुरव यांनी गाडी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्याचे सांगितले. नंतर तात्काळ गुरव यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये साहेब यांच्याशी फोनवरून संपर्क करून सदर विषयाची सविस्तर माहिती दिली.
माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचने नुसार सदरील गुरांची गाडी पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या सहकार्याने आणण्यात आल्यानंतर गाडीचा तसेच गुरांचा सविस्तर पंचनामा करून सदरील गौ वंश हे वरखेडी येथील महावीर गौ,शाळा येथे रवाना करण्यात आले, तसेच पोलीस स्टेशनचे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल श्री.दिपकसिंग पाटिल यांच्या फिर्यादीवरून सदरील आरोपी विरुद्ध ०३३९/२०२१ नुसार दिनांक २९ डिसेंबर बुधवार रोजी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील मुद्देमाल १ लाख ३०,००० रुपयेचा मुद्देमाल गाडी सकट जप्त करण्यात आला आहे. सदरील गाडी ही पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली असून वरखेडी येथील बजरंग दल कार्यकर्ते निलेश अशोक पाटिल, राहुल राजू महाले, ग्रामपंचायत सदस्य योगेश अशोक चौधरी हे साक्षीदार असून पुढील गुन्ह्याचा तपास पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनचे सहा.पो.नि.श्री कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली वरखेडी बिटचे ए.एस.आय. श्री.विजयदादा माळी हे करीत आहे.