दोन दुचाकी एकमेकावर धडकल्याने एकाचा मृत्यू तर एक जखमी पाचोरा येथील घटना.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०५/२०२३
पाचोरा शहरातील एम. एम. कॉलेज जवळीक श्री. दत्त मंदिराजवळील गतीरोधक जवळ दोन दुचाकी एकमेकावर धडकल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली असून एक दुचाकीस्वार अपघातस्थावरुन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की भडगाव तालुक्यातील कोठली येथील नाना मुरलीधर बोबडे व संजय रतन पाटील हे दुचाकीवरुन कोठली गावाकडे निघाले होते. यावेळी नाना मुरलीधर बोबडे हे दुचाकी चालवत होते तर संजय रतन पाटील हे मागच्या सीटवर बसलेले होते. यावेळी यांची गाडी एम. एम. कॉलेज जवळील श्री. दत्त मंदिर परिसरातून जात असतांनाच यांच्या दुचाकी समोर दुसरा एक दुचाकीस्वार पुढे चालवत होता. याच रस्त्यावरून जातांना पुढे चालणाऱ्या दुचाकीस्वाराने गतीरोधकाजवळ गाडीला अचानकपणे जोरदार ब्रेक लावल्याने मागाहून दुचाकी चालवत येणारे नाना मुरलीधर बोबडे यांना काही कळायच्या आतच यांची दुचाकी समोरच्या दुचाकीवर जोराने धडकल्याने नाना बोबडे यांच्या गाडीवर मागे बसलेल्या संजय पाटील यांचा तोल जाऊन ते रस्त्यावर पडले व नाना बोबडे यांनाही मार लागला.
या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन नाना बोबडे व संजय पाटील यांना वृंदावन हॉस्पिटलमध्ये आणले दवाखान्यात आणल्यानंतर डॉ. निळकंठ पाटील यांनी गंभीर जखमी झालेल्या संजय पाटील यांची तपासणी केली व तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले तर जखमी नाना बोबडे यांच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीसांनी घटनास्थळी जाऊन रितसर पंचनामा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच कोठली व निंभोरा गावासह भडगाव शहरातून हळहळ व्यक्त केली जात होती.