गुराढोरांना लाळी,खुरकट आजाराची लागण झाल्याने पशुधन पालक संकटात.एफ. एम. डी.लसीकरण करुन कायमस्वरुपी पशुधन पर्यवेक्षकाची नेमणूक करण्याची मागणी.
लाळी,खुरकटची लागण झालेले कालवड जणू उपचारासाठी या आजीबाईंकडे मदत मागत आहे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०९/२०२१
पाचोरा तालुक्यासह सर्वदूर गुराढोरांना लाळ खुरकट आजाराची लागण झाली असल्याने पशुधन पालक संकटात सापडला असून गुराढोरांना त्वरित एफ.एम.डी.चे लसीकरण करण्यात यावे अशी मागणी पशुधन पालकांनी केली आहे.
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे श्रेणी एक मध्ये पशुवैद्यकीय दवाखाना आहे. या दवाखान्याचे कार्यकक्षेत अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, जोगे वडगाव, कोकडी तांडा, कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक, कोल्हे,अटलगव्हान,डांभुर्णी,या गावांचा समावेश असून या खेड्यातील पशुधन संख्या अंदाजे ४५०० ते ५००० पर्यंत आहे. या पशुधनाचे देखभालीसाठी अंबे वडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ. गौतम वानखडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परंतु हे पशुधन पर्यवेक्षक बाहेर गावाहून ये,जा करतात तसेच त्यांना पाचोरा तालुक्यातील नेरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. या कारणास्तव ते नियमितपणे अंबे वडगाव येथे येऊ शकत नाही. त्यामुळे वरिल गावागावातील शेकऱ्यांना त्यांच्या मालकीच्या गुराढोरांना उपचार करुन घेण्यासाठी वेळेवर वैद्यकीय मदत मिळत नसल्याने किंमती जनावरे दगावण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. असे पशुधन पालक सांगतात.
म्हणून अंबे वडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कायमस्वरूपी पशुधन पर्यवेक्षाकाची नेमणूक करावी तसेच त्वरित (एफ.एम.डी.)चे लसीकरण करुन आमचे पशुधन वाचवावे अशी मागणी केली जात आहे.
(मा.श्री. ए.आर.महाजन तालुका पशुधन विस्तार अधिकारी) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पाचोरा तालुक्यात गुराढोरांना साठी एप्रिल व मे महिन्यात (एफ.एम.डी.)चे लसीकरण करुन घेण्यासाठी ६४१५० लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले होते. लस उपलब्ध झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना आपपल्या गुराढोरांचे लसीकरण करुन घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करुन लसीकरण करून घेण्यासाठी सुचविले होते. परंतु त्यावेळी जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून आपल्या गुराढोरांना लसीकरण करून घेतले. यात एकुण ३८५७४ गुराढोरांना लसीकरण करण्यात आले आहे.
मात्र काही शेतकऱ्यांनी या लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या गुराढोरांना लसीकरण करता आले नाही. व उपलब्ध असलेल्या लसीकरणाचे २५५७६ डोस परत गेले असल्याने आम्ही काहीच करू शकलो नाही. तसेच आता पुन्हा पुढील महिन्यात लवकरच लसीकरणासाठी लस उपलब्ध होईल व राहिलेल्या गुरांसाठी लसीकरण करण्यात येईल परंतु शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करत आम्हाला सहकार्य करावे अशी अपेक्षा सत्यजितच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.