दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/११/२०२२

रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे” असे मोठ, मोठे फलक लावून जाहीरात केली जाते व याकरिता लाखो रुपये खर्च केला जातो परंतु रस्त्यावरुन प्रवास करतांना रस्त्यांची दयनीय अवस्था पाहून शासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने हे लावलेले फलक म्हणजे जनतेची अक्षरशा केलेली फसवणूकच असल्याचे लक्षात येते असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण कोणतेही स्वयंचलित वाहने घेतांनाच वाहनधारकांकडून आजीवन एकरकमी पथ कर म्हणजे (रोड टॅक्स) वसूल केला जातो. मग हा पैसा जातो कुठे हा कळीचा मुद्दा आहे.

कारण याचेच जिवंत उदाहरण म्हणजे जामनेर ते पाचोरा रस्त्यावर शेंदुर्णी ते पाचोरा रस्त्याची झालेली चाळण पाहून अक्षरशा रडकुंडीला आलेल्या वाहनधारकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया लिहिण्यासाठी घेतल्या तर नक्कीच सार्वजनिक बांधकाम विभागाची व लोकप्रतिनिधींची नाचक्की होईल म्हणून आम्ही त्या प्रतिक्रिया बातमीत जनतेसमोर मांडण्याचा विचार तुर्तास टाळतो आहोत.

खड्डा चुकवा व बक्षीस मिळवा पाचोरा, जामनेर तालुक्यातील लोकप्रतिनिधींसाठी अनोखी स्पर्धा.

जामनेर ते पाचोरा रस्त्यावर शेंदुर्णी ते पाचोरा दरम्यान डांबरीकरण असलेला रस्ता दाखवा व बक्षीस मिळवा असे फलक लावले तरी ते शोभून दिसतील कारण शेंदुर्णी ते पाचोरा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्यांची दुरुस्ती व्हावी म्हणून जनतेच्या आलेल्या तक्रारींची दखल घेत सत्यजित न्यूज कडून वारंवार आवाज उठवून रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. तरीही कुंभकर्ण झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सरतेशेवटी लोकप्रतिनिधींना जाग येण्यासाठी लोकप्रतिनिधींसाठी सत्यजितच्या माध्यमातून (खड्डा चुकवा व बक्षीस मिळवा) अशी शर्यत लाऊन बक्षीस जाहीर केले होते तरीही लोकप्रतिनिधी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आजपर्यंत कोणतीही दखल घेतली गेली नाही.

रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे, म्हणून वरखेडी पाचोरा दरम्यान उद्या खड्डे पूजनाचा कार्यक्रम.

सार्वजनिक बांधकाम विभाग व जबाबदार लोकप्रतिनिधी हे या रस्त्याच्या नुतनीकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याने या रस्त्यावर दररोज लहान, मोठे अपघात होऊन दररोज कित्येक वाहनधारक जखमी होत आहेत तर काही वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार घेत आहेत. तसेच एस. टी. बस व स्वमलाकीच्या चारचाकी वाहन धारकांना या रस्त्यावरून वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत असून सोबतच कंबरदुखी व पाठदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने वाहनधारकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

जनतेच्या आलेल्या तक्रारींची दखल घेऊन प्रसारमाध्यमांनी रस्त्याच्या नुतनीकरणासाठी वारंवार आवाज उठवून सुध्दा काहीएक फायदा होत नसल्याने आता सार्वजनिक बांधकाम विभाग जामनेर व पाचोरा तसेच लोकप्रतिनिधींनी यांना कुंभकर्ण झोपेतून जागे करण्यासाठी व त्यांच्या गलथान कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी सरतेशेवटी म्हणजे उद्या दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी दहा वाजता वरखेडी ते पाचोरा दरम्यान रस्त्यावर असलेल्या खड्यांचे गुलाल, अगरबत्ती लाऊन व श्रीफळ वाढवून खड्डे पुजन करण्यात आले आहे.

यावेळी माजी सरपंच धनराज रघुनाथ पाटील, संजय तुकाराम पाटील, कैलास जयराम पाटील, संतोष चौधरी, हिम्मत जाधव, जगन्नाथ बाबुराव पाटील, अनिल भागवत पाटील, गणेश बालू पाटील, हेमंत पुरूषोत्तम पाटील, पवन शेनफडू पाटील, राहुल भोजराज भोई आदी उपस्तित होते.