पाचोरा व भडगावला उद्या मध्यरात्रीपासून पाच दिवसीय जनता कर्फ्यु, व्यापाऱ्यांच्या विनंतीला आमदारांनी दिला मान .
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०५/२०२१
जळगाव जिल्ह्यासह पाचोरा-भडगावात तालुक्यात वाढलेली कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात यावी व तालुक्यातील कोरोनाची साखळी खंडित करता यावी यासाठी दिनांक १५ ते २२ मे पर्यंत ७ दिवसांचा जनता कर्फ्यु पाळण्याचा एकमुखी निर्णय सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. होता मात्र तद्नंतर व्यापाऱ्यांनी आ.किशोर आप्पा पाटील यांना आधी पेक्षा रुग्ण संख्या नियंत्रणात येत असल्याने जनता कर्फ्युचा कालावधी कमी करण्याची विनंती केल्याने सर्व व्यापारी बांधवांच्या विनंतीला मान देत अखेर जनता कर्फ्यु दि. १५ ते २२ मे ऐवजी दि.१४ मे च्या रात्री बारा वाजेपासून ते दि १९ मे च्या रात्री बारा वाजेपर्यंत अर्थात पाच दिवसांचा जनता कर्फ्यु करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
तरी या झालेल्या बदलाची सर्वांनी नोंद घेत कसोशीने जनता कर्फ्यु पाळत यावा तसेच भडगाव व पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेनेही या लॉकडाऊन मध्ये सामील होऊन सहकार्य करावे याकरिता वैद्यकीय सेवा किंवा अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही शहरात येऊ नये तसेच आपल्याला गावपरिसरात तसेच आपल्या दोघ तालुक्यातून कोरोना हद्दपार करण्यासाठी एकजूट दाखवावी व जनताकर्फ्युचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन आ.किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे.
दरम्यान आधीच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरल्या प्रमाणे अत्यावश्यक सेवेतील केवळ मेडिकल पूर्णवेळ तर दुध डेअऱ्या या सकाळी ७ ते १० व संध्याकाळी ६ ते ९ या वेळात उघड्या ठेवता येणार आहेत. तर कृषी केंद्र मात्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र इतर सर्व
प्रकारची व्यापारी प्रतिष्ठाने ,किराणा दुकाने भाजीपाला संपूर्णपणे बंद ठेवण्याबाबत सहमती झाली आहे. तसेच विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांविरुद्ध देखील दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व जनतेने या जनता कर्फ्यु मध्ये सहभागी होत आपण जबाबदार नागरिक आहोत हे सिद्ध करावे असे आवाहन सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने आ.किशोर आप्पा पाटील यांचेवतीने करण्यात आले आहे.