गाळ्यांची लिलाव प्रक्रिया नियमानुसारच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निकाल; तक्रार अपील फेटाळले
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०९/२०३१
पाचोरा नगरपरिषदेने जळगाव येथील फुले मार्केटच्या धर्तीवर तीन मजली नवीन कै. के. एम. (बापु) पाटील व्यापारी संकुल उभारले आहे. मात्र यातील अटी शर्ती बाबत आक्षेप घेत चंद्रकांत मुरलीधर येवले व पितांबर गोविंदा पाटील यांच्यासह इतर काहींनी जिल्हा अधिकाऱ्यांच्या न्यायालयात तक्रार अपील दाखल केले होते.
दरम्यान दोन्हीं बाजूंचे युक्तिवाद ऐकून जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारदाराचे अपिल फेटाळून लावत पाचोरा नगर पालिकेने राबवलेली लिलाव प्रक्रिया नियमानुसारच असल्याचा निकाल दिला आहे. दरम्यान या निकालामुळे व्यापारी बांधवांना आता पैसे भरण्यासाठी अल्प मुदत मिळाली असून त्यांनी बोली रक्कम वेळेत न भरल्यास अनामत रक्कम जप्त करून सदर गळ्यांचा पुनर्रलिलाव करण्याचा इशारा मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांनी दिला आहे.
पाचोर येथे उभारलेल्या कै. के. एम. (बापु) पाटील व्यापारी संकुलात तळमजल्यावर फळे व भाजीपाला विक्रेत्यांसाठी १४२ ओटे, पहिल्या मजल्यावर ५८ तर दुसऱ्या मजल्यावर १०१ गाळे काढून त्याची रितसर विविध वृत्तपत्रात जाहिरात देऊन ऑन कॅमेरा व प्रांताधिकारी व मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत लिलाव प्रक्रिया पार पाडली होती.व्यापारी बांधवानी देखील या लिलाव प्रक्रियेस उस्फुर्त प्रतिसाद दिला होता. दरम्यान या गाळे धारकांना घालून दिलेल्या अटी व शर्तींमध्ये मोठ्या स्वरूपाची तफावत असल्याची आवई उठवत काहींनी गैरसमज पसरवले होते.
दरम्यान गाळे धारकांची फसवणूक झाल्याची तक्रार येथील या अपिलावर नोटीस काढून जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारदार व नगरपरिषदेस दि. १ जून २०२१ व दि. १५ जून २०२१ रोजी युक्तिवाद करून त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी दोघ बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर तक्रारदाराचे अर्ज नामंजूर करून नगरपरिषदेच्या बाजूने निकाल दिला असल्याने आता गाळे धारकांना आपला व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली आहे.तसेच नगरपालिकेने तातडीने गाळे धारकांनी उर्वरित रक्कम निर्धारीत अल्प मुदतीमध्ये भरण्याचे आवाहन केले आहे अन्यथा गळ्यांचा पुर्नलिलाव केला जाणार असल्याचे म्हटले आहे.