धावत्या बसचे चाक निखळले,चालकाच्या प्रसंगावधनामुळे अपघात टळला.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०८/२०२१
राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग व प्रादूर्भावामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. गेले दिड वर्षांपासून रेल्वे, एसटी वा खाजगी प्रवासी सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली असून एसटी महामंडळाला याचा मोठा फटका बसला आहे. यातून सावरत गेल्या २०२१ जून महिन्यापासून जेमतेम एसटी बस वाहतूक व्यवस्था सुरळीत होत असतांना दिसत असली तरी सद्यस्थितीत रेल्वे प्रवासी सेवा केवळ आरक्षीत तिकीटधारकांसाठी असून अजूनही सर्वसामान्य नियमित मासिक पासधारक व अन्य प्रवाशांसाठी सुरू झालेली नाही.
राज्यात एसटी बससेवा सुरु झाली असली तरी गेल्या वर्ष-दिड वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग व प्रादूर्भावामुळे सद्यस्थितीत संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांतर्गत प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण करण्याचे जिल्हा तसेच राज्य शासनाचे निर्देश आहेत. परंतु बस आगारातून निघण्यापूर्वी निर्जंतुकीकरण तर दूरच परंतु पंक्चर, नादुरूस्त, वा आवाज करणार्या गाड्यांची वेळेवर देखभाल दुरूस्ती वा तपासणी न करताच या बसगाडया रस्त्यावर धावत आहेत.
या गलथान कारभाराचा फटका मात्र सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. आज सकाळी जळगाव आगाराची एसटी बस क्रमांक एम.एच.१४ बी.टी.२१७८ जळगाव ते चाळीसगाव बस रस्त्यावरून धावत असतांना जळगाव शहरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावरील जैन व्हॅली पासून थोड्याच अंतरावर असलेल्या मनपाच्या जुन्या जकात नाक्याजवळ सकाळी ८ वाजता जात असतांना वाहकाच्या बाजूचे चाक एक्सलमधून निखळले. परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे व टायर मडगार्डच्या पत्र्यात अडकल्याने अपघात टळला. मात्र एसटीच्या तिकीटाचे पैसे तर गेलेच गाडीतील सर्वसामान्य प्रवाशांना पुढील नियोजित ठिकाणी जाण्यासाठी पुढील प्रवासासाठी इतर वाहनातून जाण्यासाठी पुन्हा प्रवासभाडे द्यावे लागल्याने आर्थीक फटका सहन करावा लागला.
जिल्हयात संसर्ग प्रादूर्भावानंतर काही प्रमाणात बसेस सुरू झाल्या आहेत तर काही ग्रामीण भागासह अन्य ठिकाणी आवश्यकता असली तरी बसेस सुरू नाहीत. परंतु महामार्गावर नियमित वेळेनुसार धावणार्या एसटी मंडळाच्या बहुतांश बसेस नादुरूस्त, भंगार अवस्थेतील, विविध प्रकारचे आवाज येणार्या बसेसमुळे अपघातासह रस्त्यावरच नादूरूस्त होत असल्याचे दिसून येत आहे.
नियोजनाचा अभाव
सद्यस्थितीत रेल्वे सेवा कोवीड स्पेशलच्या नावाखाली मोजक्याच प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एसटी महामंडळाला आर्थीक उत्पन्नाचे स्त्रोत हि जमेची बाजू आहे. परंतु या संधीचा फायदा एसटी महामंडळ नादुरूस्त गाडयाव्दारे महसूल जमा करीत आहे. आगारातून वेळेवर गाडयांची दुरूस्ती देखभाल न करता नादुरूस्त गाडया रस्त्यावर महामंडळाकडून चालवत आहे. प्रत्येक बसचे किमान १०,००० किमी. प्रवासानंतर वेळेवर इंजिन ऑईल तपासणी करणे गरजेचे असते. परंतु निश्चित असलेल्या मार्गावर आगारातून बस काढण्यापूर्वी कोणतीही तपासणी न करताच केवळ डिझेल भरून या बसेस रस्त्यांवर धावत आहेत. याकडे आगार प्रमुख, वाहतुक नियंत्रक, वा सर्वच अधिकारी कर्मचार्यांचा समन्वय नसल्याने दूर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी की गैरसोयीसाठी असा प्रश्न सर्वसामान्यंामधून उपस्थित केला जात आहे.