पाचोरा तालुक्यातील आठवडी बाजार सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी. व्यापारी व शेतकऱ्यांची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०८/२०२१
जळगाव जिल्ह्यातील अधिकारी वर्ग, वैद्यकीय विभाग, पोलिस यंत्रणा, विविध संघटना, लोकप्रतिनिधी यांनी कोरोनाला पळवून लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले व सर्व स्थरातून जनतेने लॉकडाऊचे नियम पाळून मोलाचे सहकार्य केल्यामुळे या संघटीत संघर्षाचे फळ आज जिल्हावासीयांना मीळाले असून आज रोजी कोरोना रुग्ण संख्या शून्यावर येऊन मोठा दिलासा मिळाला आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी मा.मुख्यमंत्री यांनी लॉकडाऊचे नियम शिथील करत रात्री आठ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यासाठी तसेच इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी पर्यंत शिक्षण व्यवस्था खुली केली आहे.
म्हणून आता जळगाव जिल्हा शून्यावर येऊन ठेपल्याने जिल्ह्यातील तसेच पाचोरा तालुक्यातील आठवडी बाजार सुरु करण्यासाठी परवानगी देऊन आठवडी बाजार त्वरित सुरु करावेत अशी मागणी होत आहे.
कारण आठवडी बाजार म्हणजे ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा असून शेतकरी वर्ग, मजूर वर्ग, भाजीपाला पिकवणारे भाजीपाला उत्पादक शेतकरी, आठवडी बाजार भरणाऱ्या गावातील लहान, मोठे व्यवसायीक लॉकडाऊन लागल्यापासून हातावर हात ठेवून बसलेले आहेत.
विशेष म्हणजे आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला असून, मजूर वर्गाला दैनंदिन लागणारा किराणा, भाजीपाला व इतर संसारपयोगी वस्तू घेण्यासाठी तालुयाचे ठिकाणी जाऊन खरेदी करणे म्हणजे एक दिवसाची मजूरी बुडवून प्रवासखर्च करणे परवडणारे नसल्याने ऐन कामकाजाचे दिवसात दिवसभर श्रम केल्यावरही घरात भाजीपाला नसल्याने तिखट, भाकरी खाऊन दिवस काढावे लागत असल्याने मजूरांना दिवसभर श्रम करुनही सकस आहार मिळत नसल्याने त्यांना अशक्तपणा व शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागत आहे
महत्त्वाचे म्हणजे गुराढोरांचे बाजार बंद असल्याने गरजू पशुपालकांना जनावरांची खरेदी, विक्री करणे गरजेचे असल्यावरही बिकट परिस्थीतीला सामोरे जावे लागत असून गरजेपोटी दुभत्या गायी, म्हशी व जातिवंत बैल मातीमोल भावात विकावे लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे शेळीपालन व्यवसायीक व व्यापारी अडचणीत सापडले असून मासविक्री करणाऱ्या व्यवसायीकांनी या मजबुरीचा फायदा घेत बोकड खरेदी करत आहेत.
आठवडी बाजार म्हणजे सर्वसामान्य व खेडेगावातील जनतेच्या जिवनातील अत्यावश्यक बाब असल्याने आठवडी बाजार सुरु करण्यासाठी त्वरीत आदेश काढून परवानगी द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.