बाहेर किर्तन, घरात तमाशा, वयोवृद्ध महिलेस मारहाण करणाऱ्या किर्तनकार बाबांवर कडक कारवाई व्हावी. सुमीत पंडीत यांची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०६/२०२१
सद्या सोशल मीडियावर महाराष्ट्रभर एक इसम वयोवृद्ध महिलेला हाताने व प्लास्टिकच्या बादलीने अमानुषपणे मारहाण करण्याचा तब्बल ०४ मिनिटे २५ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बघ्यांची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय रहात नाही. म्हणून बऱ्याचशा लोकांनी सत्यजीत न्यूजकडे अमानुष अमानुष मारहाणीचा व्हिडीओ पाठवून पाठपुरावा करुन त्या महिलेस न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
याचा तपास करत असतांनाच समाजसेवक मा.श्री. सुमीत पंडीत माणूसकी रुग्ण सेवा समूह औरंगाबाद यांनी सत्यजीत न्यूजकडे त्यांचा व्हिडीओ पाठवत संबंधित इसमाबद्दल सविस्तर माहिती देत कठोर कारवाईची करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
सुमीत पंडीत यांनी दिलेली माहिती अशी की या वयोवृद्ध महिलेला मारहाण करणारा व्यक्ती हा कल्याण तालुक्यातील मंगलपट्यातील व्दारली या गावात बाहेरगावाहून आला असून तो स्वतःला ह.भ.प.महाराज म्हणवून घेत असून त्याचे नाव गजानन महाराज चिकनकर (किर्तनकार) व्दारली येथील आहेत.
हे जरी किर्तनकार असलेतरी ते ज्या अमानुष पध्दतीने आईसमान असलेल्या एका वयोवृद्ध महिलेस चापट, बुक्क्यांनी तसेच प्लॅस्टिक बादलीने मारहाण करत आहेत. हे व्हिडीओ मध्ये स्पष्टपणे दिसून येते असल्याने हे महाशय जरी स्वताला किर्तनकार म्हणवून घेत असले तरी हे रावणालाही लाजवतील असे कृत्य करत असल्याने यांची किर्तनातून समाज जागृती करण्याची लायकी नसल्याचे दिसून येत असल्याने अश्या बाहेर किर्तन,घरात तमाशा करणाऱ्या व लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण स्वता कोरडे पाषाण अश्या पाषाण ह्रदयी किर्तनकार गजानन महाराज यांची सखोल चौकशी होऊन कठोर कारवाई व्हावी अशी मागणी समाजसेवक सुमीत पंडित व हजारो लोकांकडून होत आहे.
तसेच मारहाणीत ज्या वयोवृद्ध महिलेला मारहाण होत आहे. त्या आजी जर संबंधित बाबांच्या आई असतील तर आता त्यांच्याजवळ असलेल्या इस्टेटमधुन या ढोंगी बाबाचा वारसाहक्क काढून टाकण्यात यावा व भविष्यात या वयोवृद्ध महिलेच्या जीविताला धोका होणार नाही अशी उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे.