पक्षाची ताकद वाढविणार : पंकजा मुंडे
मुंबई- भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला याबद्दल मी आभारी आहे. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मी सर्व प्रकारे प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया नव्याने राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड झालेल्या पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी गेली अनेक दशके आपली हयात घातलेल्या लाखो कार्यकर्त्यांच्या, स्वयंसेवकांच्या त्याग आणि समर्पणाला अभिवादन करून भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव पदाच्या जबाबदारीचा सहर्ष सविनय स्वीकार करते, असे त्या म्हणाल्या.
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि विजया रहाटकर यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली.