खेडेगावात येत नाही लालपरी , म्हणून शालेयविद्यार्थी राहातात घरी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०१/२०२१
सर्वदूर कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून लॉकडाऊन सुरु झाल्याने दैनंदिन व्यवहार थांबले होते. कोरोनाचा प्रसार होऊनये म्हणून दळणवळणाची सर्व साधने बंद करण्यात आली होती. यातच परिवहन मंडळाच्या एसटी बसेसचाही समावेश होता.
परंतु आता मागील महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत गेल्यानंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. ठराविक चौकटीत नियम पाळत दळणवळणाची मुभा देण्यात आली. यात गोरगरिबांची लालपरी म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसेस सुरु करण्यात आल्या आहेत.
मात्र या एसटी बसेस फक्त मुख्य रस्त्यावरून ठराविक गावांसाठी तसेच तालुका व जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावासाठीच सुरु करण्यात आल्या असून लहानमोठ्या (ग्रामीण भागातील) खेडेगावाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
तसेच आता माध्यमिक शाळा नियमितपणे सुरु झाल्या असून खेड्यापाड्यातून शिक्षण घेण्यासाठी शहराचे व तालुक्याचे ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून यात मुलींची संख्या जास्त आहे. तसेच शाळा, कॉलेज सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांनी पासेस काढल्या आहेत. मात्र खेडेगावात एसटी बसेस येत नसल्याने व इतर वाहनांची व्यवस्था नसल्याने व असलीच तर ती खर्चिक बाब असल्याने विद्यार्थ्यांना परवडणारे नसल्याने त्यांना घरापासून तर शाळेपर्यंत पायपीट करावी लागत आहे.
तसेच याच खेडेगावातील जेष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी, रुग्ण यांचीही गैरसोय होत असून परिवहन मंडळाने ग्रामीण भागातील विद्यार्थी व ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन प्रत्येक खेडेगावात योग्य वेळेवर पूर्वीप्रमाणे एसटी सुरु करुन लालपरीवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना न्याय द्यावा अशी मागणी जिल्हाभरातील खेडेगावातून होत आहे.
(एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असे म्हटले जाते परंतु याच एसटीने ग्रामीण भागाकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे. तसेच गावागावात एसटी बसेस सुरु करण्यासाठी शालेयसंस्था व ग्रामपंचायतीने पाचोरा व जामनेर आगाराकडे बससेवा सुरु करण्यासाठी निवेदने देऊनही
बससेवा सुरु होत नाहीत तसेच या दोघही आगाराचे आगारप्रमुख प्रवाशांना समाधानकारक उत्तर देत नसून मनमानी करत असल्याचा आरोप खेडेगावातील विद्यार्थी व प्रवासी करत आहेत.)