जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात भेसळयुक्त दूधाचा महापूर, सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/१०/२०२३
जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात भेसळयुक्त दूधाचा महापूर आला आहे. याचेच जीवंत उदाहरण म्हणजे चाळीसगाव शहरात नुकतेच मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दुध पकडून या चाललेल्या गोरखधंद्याचा पर्दाफाश करण्यात आला असला तरी अद्यापही जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ करुन सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळ खेळला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजच्या हाती आले आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता जाणकारांनी दिलेली माहिती अत्यंत गंभीर स्वरुपाची असून जर हा प्रकार खरा असेल तर मग शासन, प्रशासनाला जाब विचारायला पाहिजे तरच हा भेसळयुक्त दूधाचा गोरखधंदा बंद होऊन सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी होणारा खेळ थांबेल नाहीतर भविष्यात सर्वसामान्य जनतेला कॅन्सरसारख्या आजाराला सामोरे जावे लागेल असे जाणकारांचे मत आहे.
याबाबत जाणकारांच्या मते जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यातील गाय, म्हैस या दुभत्या जनावरांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. तसेच सद्यस्थितीत गाय, म्हैशींची एकुण संख्या लक्षात घेता ती अत्यंत नगण्य असल्यावरही जळगाव जिल्ह्यातून दररोज शेकडो नव्हे तर हजारो टॅंकर भरुन, भरुन दुध हे मुंबई, पुन्हा, संभाजी नगर व इतर महानगरीत पोहच केले जात आहेत. यात जाणकारांनी मांडलेल्या मतांचा विचार केला तर ही बाब लक्षात घेता जळगाव जिल्ह्यात गाय, म्हैस यांची एकुण संख्या यापैकी आजच्या परिस्थितीत एकुण गाभण व भाकड गायी, म्हशी यांची आकडेवारी लक्षात घेता आजच्या परिस्थितीत एकुण दुभती जनावरे व त्यांच्यापासून मिळणाऱ्या दुधाची आकडेवारी लक्षात घेता एवढ्या मोठ्या प्रमाणात दुध मिळतेच कसे हा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे.
कारण जळगाव जिल्ह्यातील एकुण दुभत्या जनावरांची संख्या, त्यांच्या पासून मिळणारे एकुण दुध, यात दुभत्या जनावरांना पाजलं जाणार दुध, प्रत्येक पशुधन पालकांच्या घरी दैनंदिन वापरासाठी तसेच गाव पातळीवर किरकोळ विक्री होणारे दुध, गावपातळीवर व शहरातील सुरु असलेली चहाची दुकाने, टपरी यात दररोज वापरले जाणारे दुध तसेच हॉटेल, उपहारगृह, वेगवेगळ्या परप्रांतीयांच्या मिठाईच्या दुकानात दुधापासून बनवलेले पेढे, श्रीखंड, रसमलाई, दुधाची बर्फी, मावा (खवा), कलाकंद इतर मिठाई तसेच उन्हाळ्यात व बाराही महिने विक्री होणारे दुधापासून बनवलेले लस्सी, ताक, दही, आईस्क्रीम, कुल्फी, पनीर, चोवीस तास पाहिजे तितक्या दुधाच्या पॅकिंग केलेल्या थैल्या व इतर थंड खाद्यपदार्थ यांची निर्मिती व विक्री तसेच मोठ्या शहरांकडे दुधाने भरलेल्या मोठ, मोठ्या टॅंकरची क्षमता व संख्या याची संपूर्ण आकडेवार काढून याची आकडेमोड केली तर नक्कीच डोक फुटायची वेळ येईल हे मात्र निश्चित.
हा दुध भेसळीचा गोरखधंदा राजरोसपणे सुरु असल्यावरही अन्न व औषध प्रशासन या गंभीर विषयाकडे का लक्ष देत नाही हा एक कुतुहलाचा विषय असून याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता या भेसळ करणाऱ्या दुध सम्राटांनी कोणत्याना ना कोणत्या राजकीय नेत्यांच्या संपर्कात राहून राजाश्रय मिळवून घेतला आहे तर काही भेसळ सम्राट राजकारणात सक्रिय आहेत. यामुळे संबंधित विभागाचे जबाबदार अधिकारी यांच्यावर दबाव येत असल्याने या अधिकाऱ्यांची इच्छा असूनही भेसळयुक्त दूध उत्पादकांवर ते कारवाई करु शकत नसल्याने त्यांनी गांधीजींच्या तीन माकडांची भुमिका घेत आपला बचाव करुन घेत आहेत.
पुढील भागात
दुध भेसळीचा संपूर्ण तपशील व त्यात वारले जाणारे घातक पदार्थ व त्यांचे शरीरावर दुष्परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल.