शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयात सहा दिवसीय आत्मनिर्भर युवती कार्यक्रमाला सुरुवात.
डॉ. योगिता चौधरी.(शेंदुर्णी)
दिनांक~०९/०२/२०२४
आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालया अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यातर्फे दिनांक ०९ फेब्रुवारी शुक्रवार ते १५ फेब्रुवारी गुरुवार २०२४ या सहा दिवसीय आत्मनिर्भर युवती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या सहा दिवसीय कार्यक्रमात दररोज वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान आयोजित केले आहे.
या व्याख्यानमालेचा शुभारंभ आज महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा. शाम साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली मोहिनी गुजर व संजिवनी पाटील या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत झाला असून आज पहिल्या दिवशी युवती स्वयंरोजगार प्रशिक्षण व स्वयंरोजगाराच्या शासकीय योजना या विषयावर नामवंत कॉम्प्युटरच्या संचालिका सौ. उषाताई पाटील आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून मुलींना स्वयंरोजगाराची संधी प्रदान करणाऱ्या आशु मेक ओव्हरच्या संचालिका कुमारी अश्विनी पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थीनींनी शिक्षण घेत असतांना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहन करत सद्यस्थितीत दैनंदिन जीवनात ब्युटी पार्लर व कम्प्युटर याला जास्त महत्व प्राप्त झाले असून या व्यवसायात महिलांनी पुढे यावे तसेच लघुउद्योग, गृह उद्योग व विविध क्षेत्रात महिलांना असलेल्या संधीची माहिती विद्यार्थीनींना दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. योगिता चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजयजी भोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थीनी, शिक्षण व शिक्षकेतर बंधू, भगिनींची उपस्थितीत लाभली.