काय ती बालवाडी, काय तो बांधकाम ठेकेदार, काय ते लोकप्रतिनिधी,अन ही गळकी अंगणवाडी बालकांना बसण्यास नॉट ओके.

सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~१२/०७/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील महादेव मंदिर परिसरात असलेली अंगणवाडी सद्या सुरू असलेल्या सतत धार पाऊसा मुळे गळत आहे, आज या कारणाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बालवाडीत येत असलेल्या लहान चिमुकल्यांना घरी परत पाठविले, कारण अंगणवाडी ही सतत सुरू असलेल्या रिमझीम पाऊसाने गळत असल्याने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही. अंगणवाडीतील या महिला कर्मचाऱ्यांनी खाली बसण्याची जागा वारंवार कोरडी करून देखील वरून छत गळत असल्याने त्यांना मुलेच घरी पाठवायची वेळ आली.
सुमारे दहा ते बारा वर्षांपूर्वी या अंगणवाडीचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी मिळवत या गटाचे लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत झाल्याचे दिसून आले. परंतु या अंगणवाडीचे काम करीत असतांना संबंधित ठेकेदार याने मलिदा खात निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे अनेक ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. कारण की आजकाल अनेक शासकीय कामे होत असतांना भ्रष्ट्राचारी वृत्ती लक्षात घेऊन अशी कामे होताना दिसत आहेत, परंतु यावर कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नाही. किंवा यांचेवर कुणाचाही अंकुश राहीले नाही असे दिसून येते.
संबधित ठेकेदार हा जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल, या हेतूने बांधकाम साहित्य काटकसरीने, दुय्यम दर्जाचे व कमी वापरण्याचा प्रयत्न करतो, व त्याच्या कामाचे पैसे मिळाल्यानंतर त्याने बांधलेल्या इमारतीचे छळ गळो किंवा पडो याचे त्याला काहीच देणेघेणे नसते.
याचाच परिणाम आज कुऱ्हाड गावातील या बालवाडीच्या बांधकामा विषयी संशय निर्माण झाला आहे. आज या अंगणवाडी त सुमारे चाळीस ते पन्नास लहान बालके शिक्षण घेण्यासाठी व पोषण आहाराचा आनंद लुटण्यासाठी येतात, अन या पावसाळ्याच्या दिवसात जर बालकांना बसण्यासाठी जागा नसेल तर पालकांच्या मनात किती भीती राहील याचा विचार न केलेला बरा!! तसेच याच अंगणवाडीत साठवून ठेवलेला बालकांचा पोषण आहार सुद्धा छत गळत असलेल्याने पाण्यात भिजला तर याला जबाबदार कोनाला धरणार ?असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.
तरी यापुढे या बालकांच्या टाळूवरील लोणी खाण्याचे धंदे संबधित ठेकेदारांनी बंद करावे तसेच या अंगणवाडीकडे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी लवकरात लवकर लक्ष केंद्रित करून शाळेची त्वरित डागडुजी करावी जेणे करून बालकांना पूर्वी प्रमाणे नियमित पावसाळ्याच्या दिवसात या अंगणवाडीत बसण्याचा आनंद मिळेल सोबतच शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.