पाचोरा तालुक्यात राजकीय पाठिंब्यावर अवैध धंदेवाले मस्तावले, संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी धास्तावले.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/१२/२०२३
(जे राजकीय सत्ताधारी व विरोधी पक्ष तसेच निष्ठावंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अवैध धंदे व इतर गैर व्यवहार करणारांशी काहीही संबंध नसल्यास त्यांनी हा विषय मनात घेऊ नये ही नम्र विनंती.)
पाचोरा तालुक्यात राजकीय पाठिंब्यावर अवैध धंदेवाले मस्तावले, संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी धास्तावले असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही कारण पाचोरा शहरासह तालुक्यातील मोठ्या लोकसंखेच्या गावातून तसेच वाडा, वस्तीसह, लहानमोठ्या खेड्यापाड्यात भरवस्तीत, पानटपरी, उपहारगृह, लहानमोठ्या टपऱ्या व इतर ठिकाणी आडोसा घेऊन सट्टा, पत्ता, जुगार, गावठी दारुची निर्मिती व खुलेआम विक्री, सोबतच देशी व विदेशी दारुची अवैध विक्री सुरु आहे. तसेच अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक, रेती, दगड, माती, या गौण खनिजांची चोरी व अवैध वाहतूक, हिरव्यागार वृक्षांची बेसुमार कत्तल, स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी, पुरवठा विभागात दलांलामार्फत गरजूंची होत असलेली आर्थिक लुट, दिवसाढवळ्या चोऱ्या, छेडखानी, मारामाऱ्या अश्या घटना घडत असतांनाच संबंधित अधिकारी बघ्याची भूमिका घेत आहेत.
यामागील कारण ही तसेच आहे. पाचोरा, भडगाव तालुक्यातील सत्ताधारी, विरोधी तसेच राजकीय क्षेत्रात दररोज येणारे नवनवीन येणारे चेहरे यांची एक साखळी तयार झाली असून यापैकी बऱ्याचशा तरुण तुर्क व म्हाताऱ्या अर्कांनी राजकीय क्षेत्रात आपला वचक निर्माण करत याचा गैरफायदा घेत सट्टा, पत्ता, जुगार, गावठी दारुची निर्मिती व विक्री, देशी दारुची अवैध विक्री, जुगाराचे क्लब, पानटपरी व उपहारगृहात अवैध धंद्यांसह अवैध दारुची विक्री हे अवैध धंदे राजरोसपणे सुरु केले आहेत.
हे अवैध धंदे सुरु करतांना संबंधित अधिकारी, कर्मचारी व सर्वसामान्य जनतेत आपला दबदबा निर्माण करण्यासाठी ह्या अवैध धंदे करणारांनी नामी शक्कल लढवली असून त्यांनी ते ज्या जागेवर, पानटपरीवर, हॉटेलवर किंवा अन्य ठिकाणी आपल्या अड्ड्यावर राजकीय पक्षाचे झेंडे, फलक लावले आहेत. तसेच हातात दोरा, गळ्यात राजकीय पक्षाची ओळख होईल अशा रंगाचे रुमाल किंवा डोक्यावर टोपी घालून आपली वेगळी ओळख निर्माण करुन आपल पाप झाकण्यासाठी प्रयत्न करतांना दिसून येतात.
विशेष म्हणजे या अवैध धंद्याच्या विरोधात एखाद्या सक्षम कायद्याच्या रक्षकाने कारवाईचा बडगा उगारला तर संबंधित अवैध धंदे करणारांसाठी जिल्हा व तालुकास्तरावरील राजकीय सत्ताधारी, विरोधी पक्षाचे किंवा सत्तेच्या जोरावर नावलौकिक मिळवलेल्या काही तथाकथित प्रतिष्ठितांचे फोन येतात किंवा थेट पोलीस स्टेशनला जाऊन कारवाई थांबवली जात असल्याचे दिसून येते. तर याचाच फायदा घेत काही कायद्याचे रक्षक हप्ते व तोडी पाणीच्या माध्यमातून मजारो नव्हे तर लाखो रुपये कमाई करत आहेत.
यामागील एकमेव कारण म्हणजे सत्ताधारी असो विरोधात असो कि नव्याने राजकीय क्षेत्रात पदार्पण करणारी मंडळी असो यांना आपली सत्ता व प्रतिष्ठा टिकवण्यासाठी तसेच ‘*** तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देण्यासाठी, कधी हातात झेंडे घेऊन जयजयकार करण्यासाठी तर कधी हातात दांडे घेऊन मारामाऱ्या करण्यासाठी अश्या लोकाची गरज भासते म्हणून यांना आयते पोसण्यासाठी त्यांना अवैध धंदे करण्यासाठी पाठबळ दिले जात असल्याने कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी कारवाई करण्यासाठी पुढे येत नाहीत. तर दुसरीकडे सत्ताधारी व विरोधी राजकीय पक्षाच्या नेत्यांची हुजरेगिरी करत आपल चांगभलं करुन घेणारे काही अधिकार व कर्मचारी मात्र लाखोंच्या कमाईवर ताजेतवाने होतांना दिसून येत आहेत.
या सगळ्या उंदीर, मांजराच्या खेळत मात्र सर्वसामान्य जनतेला चोरा सारखे राहुन ‘जे, जे होईल ते, ते पहा, तुका म्हणे उगे रहा’ अशा पध्दतीने रहावे लागत आहे. मात्र यामुळे तरुण पिढी बर्बाद होत घरच्या, घर उध्वस्त होऊन समाजात अशांतता निर्माण झाली आहे हे मात्र तेवढेच खरे असून “पाचोरा तालुक्यात राजकीय पाठिंब्यावर अवैध धंदेवाले मस्तावले, संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी धास्तावले” असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
*पुढील भागात लवकर*
अवैध धंदे वाल्यांना भल्याभल्यांची साथ, म्हणून वाहत्या गंगेत अधिकारी व कर्मचारी धुऊन घेत आहेत हात.