सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार, गतीरोधकाने घेतला दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेचा बळी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०८/२०२२
आज सगळीकडे स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतांनाच दुसरीकडे मात्र जामनेर ते पाचोरा रस्त्यावर गतीरोधकाजवळ (पुढे गतीरोधक आहेत) किंवा गतीरोधकावर पांढरे पट्टे म्हणजे (झेब्रा क्रॉसिंग) नसल्याने पुढे गतीरोधक आहेत ही बाब दुचाकीस्वाराच्या लक्षात न आल्यामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या एका निष्पाप महिलेचा बळी गेल्याची घटना दिनांक १५ ऑगस्ट २०२२
सोमवार रोजी दुपारी ‘साडे अकरा’ वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील लोहारी गावाजवळ घडली असून या अपघाताने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा भांडाफोड झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव येथील एम.आय.डी.सी. (सुप्रीम कॉलनी) येथील रहिवासी प्रमोद दिनकर बडगुजर हे त्यांच्या एम.एच.१९,डी.बी.११८८ या क्रमांकाच्या स्वयंचलित दुचाकीवरून त्यांची आई सुशीलाबाई दिनकर बडगुजर वय वर्षे (६४) यांना घेऊन पिंपळगाव हरेश्र्वर येथील त्यांच्या शालकाच्या मुलाचा नवस फेडण्यासाठी पिंपळगाव हरेश्र्वर येथे आलेले होते. नवस फेडून दुसऱ्यादिवशी ते जळगाव येथे परत जाण्यासाठी निघाले असता अंदाजे साडे अकरा वाजेचे सुमारास लोहारी गावाजवळ असलेल्या त्यांची दुचाकी गतीरोकावर आदळली व दुचाकीवर मागे बसलेल्या सुशीलाबाई रस्त्यावर जोरात लांबवर फेकल्या गेल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागुन चेहरा पूर्णपणे खरचटला गेला होता.
हा अपघात घडताच लोहारी येथील हिंदू, मुस्लिम बांधव व महिलांनी घटनास्थळी धाव घेऊन योग्य ती मदत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करुन अपघातग्रस्त सुशीलाबाई यांना अमोल (बबलू) मराठे यांनी लोहारी ग्रामस्थांच्या सहकार्याने रुग्णवाहिकेत टाकून पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित साळुंखे यांनी सुशीलाबाईंना मृत घोषित केले. या अपघात प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करुन शुन्य क्रमांकाने पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आली आहे.