टेम्पो ट्रव्हलरची दुचाकीला जोरदार धडक वरखेडी (भोकरी) येथील ३३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०२/२०२२
पाचोरा शहरातील रेल्वे उड्डाणपूलाजवळ भरधाव येणाऱ्या टेम्पो ट्रव्हलरने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील ३३ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असुन घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील वरखेडी (भोकरी) येथील सुल्तानाबी शकील काकर (वय – ३३) ह्या त्यांच्या पती सोबत दुचाकीने दिनांक १४ फेब्रुवारी सोमवार रोजी पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या त्यांच्या वडिलांना बघण्यासाठी जात असतांना शहरातील रेल्वे उड्डाणपूलानजीक त्यांच्या दुचाकीस जारगाव चौफुलीकडुन भडगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर (क्रं. एम. एच. १९ – वाय – ६३८५) ने मागाहून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरदार होती की या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या सुल्तानाबी शकील काकर ह्या खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला व गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती चिंताजनक असल्याने सुल्तानाबी शकील काकर यांना पुढील उपचारासाठी जळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेतील टेम्पो ट्रॅव्हलर व चालक यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे हे करीत आहे. मयत सुल्तानाबी शकील काकर यांचे पाश्चात्य पती, एक मुलगी, दोन मुले असा परिवार असुन त्यांचे निधनाने वरखेडी, भोकरी गावासह सह परिसरात शोककळा पसरली आहे.