हिंदू बहिणीचा जीव वाचवण्यासाठी मुस्लिम भावाने केले रक्तदान, म्हणूनच आम्ही म्हणतो “मेरा भारत महान”
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०७/२०२३
आपण अश्या देशाचे रहिवासी आहोत की आपल्या देशाची संस्कृती जगभर श्रेष्ठ आहे. आपल्या देशात हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई व इतर धर्मीय एकाच झेंड्याखाली एकत्र रहात एकमेकांच्या सण, उत्सवात तसेच दुःखा सुखात एकमेकांसाठी धाऊन जात असतो. याचेच जिवंत उदाहरण द्यायचे झाल्यास कोरोना सारख्या महाभयंकर संकटात आपण सगळ्यांनी मिळून संघर्ष करत एकमेकांना मदत करत हे संकट पळवून लावले होते. आजही हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, हम सब है भाई, भाई असेच गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहोत.
याचेच जिवंत उदाहरण म्हणजे आज डॉ. वैभव सुर्यवंशी यांच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये सौ. आशाबाई तुके यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सौ. आशाबाई तुके यांच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. मात्र सौ. आशाबाई तुके यांना रक्ताची अत्यंत गरज होती. सौ. आशाबाई तुके यांचा रक्तगट “एबी पॉझिटिव्ह” असल्याचे डॉक्टरांनी सांगितले वेळ कमी होती म्हणून रक्त मिळवण्यासाठी शोधाशोध सुरु झाली. ही बाब कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. श्री. सचिन सोमवंशी यांना माहित झाल्याबरोबर त्यांनी त्यांचे मित्र कॉंग्रेस इंजिनियरिंग सेलचे अध्यक्ष रहीम रमजान शेख यांना तातडीने भ्रमणध्वनीवर कळवताच रहीम शेख हे धावतपळत डॉ. वैभव सुर्यवंशी यांच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले व क्षणाचाही विलंब न करता रक्तदान केल्याने सौ. आशाबाई तुके यांचे वेळेवर ऑपरेशन व उपचार करता आल्यामुळे त्यांचा जीव वाचला.
आज एका मुस्लिम बांधवांने रक्तदान केल्यामुळे एक हिंदू भगिनीला जीवदान मिळाले. आजही आम्ही हिंदू, मुस्लिम बांधव एका दिलाने एकत्र रहात आहोत. हे याचे जिवंत उदाहरण असून काही विघ्न संतोषी लोक कधी आपली स्वताची पोळी भाजून घेण्यासाठी तर कधी राजकारण करतांना आपला वाईट हेतू साध्य करण्यासाठी हिंदू, मुस्लिम बांधवांमध्ये व्देष निर्माण करणाऱ्यांसाठी ही मोठी चरपाक आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. म्हणून या प्रसंगी सन १९५९ मध्ये “धुल का फुल” या गाजलेल्या चित्रपटातील गाण्याचे बोल
(तू हिन्दु बनेगा ना मुसलमान बनेगा
इन्सान की औलाद है इन्सान बनेगा…)
या गीताच्या ओवी सहज आठवल्या.
वेळेवर रक्त उपलब्ध झाल्यामुळे सौ. आशाबाई तुके यांचे ऑपरेशन वेळेवर होऊन त्यांना जीवदान मिळाले म्हणून सौ. आशाबाई तुके व तिच्या कुटुंबीयांनी पाचोरा तालुक्याचे कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मा. श्री. सचिन सोमवंशी व रक्तदान करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे आलेले कॉंग्रेस इंजिनियरिंग सेलचे अध्यक्ष रहीम रमजान शेख यांचे आभार मानले.