पारोळा पोलिस व वनपरिक्षेत्र पारोळा संयुक्त कारवाईत दोन कासवांना मिळाले जीवदान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०३/२०२३
पोरोळा शहरात दोन इसम बादलीत पाणी व त्यात दोन जिवंत कासव घेऊन विक्री करण्याच्या हेतूने फिरत असतांनाचा प्रकार पारोळा पोलिसांच्या लक्षात आल्यावर संबंधित दोन व्यक्ती व जिवंत कासवासह एक स्टील बादली ताब्यात घेऊन पारोळा पोलिस स्टेशनमध्ये नेऊन नंतर पारोळा वनपरिक्षेत्राच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पारोळा पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी हे रामनवमी असल्याकारणाने पारोळा शहरात गस्त घालण्यासाठी गेले होते. तसेच वनपरिक्षेत्राच्या पारोळा कार्यालयात अधिक माहिती घेण्यासाठी गेल्यावर कार्यालयात एकही अधिकारी किंवा कर्मचारी आढळून न आल्यामुळे पारोळा पोलिसांनी दोन कासवासह ताब्यात घेतलेल्या दोन इसमांवर काय कारवाई करण्यात आली याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
परंतु पारोळा पोलिसांनी कासव विक्रेत्यांना पकडून वनविभागाचे ताब्यात दिल्यामुळे दोन कासवांना जीवदान मिळाले आहे. तर दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या शिकार करणारांच्या तोंडचे पाणी पळाले असून या कामगिरीबद्दल वन्यजीव प्रेमींनी पारोळा पोलिसांचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.