अनाधिकृत आरती समितीच्या माध्यमातून श्री . क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरावर नवीन ट्रस्ट स्थापन्याचा डाव, ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
प्रदीप गुजर.(शेंदुर्णी)
दिनांक~२५/०२/२०२३
जामनेर तालुक्यातील पहूर येथील देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले श्री. क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर येथे १७ वर्षांपासून ट्रस्ट अस्तित्वात असतांना अनाधिकृत स्वयंघोषित आरती समितीच्या माध्यमातून काही लोकांनी नवीन ट्रस्ट स्थापन करण्याचा डाव रचल्याचे उघड झाल्याने पहूर येथे प्रचंड खळबळ उडाली असून याबाबत ट्रस्टचे अधिकृत अध्यक्ष शिवभक्त ह. भ. प. या. श्री. रंगनाथ महाराज यांनी या. जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्जाद्वारे आक्षेप घेतला आहे.
श्री. क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर हे पहुर येथून शेंदुर्णी मार्गावर दोन किलोमीटर अंतरावर वसलेले भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गेल्या ४० वर्षांपासून येथे शिवभक्त रंगनाथ महाराज पुजारी म्हणून सेवा करत आहेत. त्यांच्या अथक परिश्रमाद्वारे या मंदिराचा विकास आणि जिर्णोद्धाराचे कार्य लोक सहभागातून होत आहे. या मंदिरावर २००६ मध्ये ट्रस्ट स्थापन करण्यात आले असून (ई १०८६) असा नोंदणी क्रमांक प्राप्त झाला असून शिवभक्त रंगनाथ महाराज हे अध्यक्ष म्हणून यशस्वीरित्या धुरा सांभाळत आहेत.
तरीसुद्धा पहूर गावातील काही लोकांनी ट्रस्टची कुठलीही परवानगी न घेता अनधिकृत रित्या स्वयंघोषित आरती समिती स्थापन करून मंदिराच्या नावात फेरबदल करून एकाच मंदिरावर नवीन ट्रस्ट स्थापन करण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालय जळगाव येथे प्रस्ताव दाखल केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आरती समितीचे पितळ उघडे पडले असून नेमका मंदिरावर व मंदिर परिसरात असलेल्या खुल्या भूखंडावर कब्जा मिळवणे हा तर समितीचा विचार नाही ना ? असा सवाल संतप्त भाविक करीत आहेत.
याप्रकरणी ट्रस्टतर्फे धर्मदाय आयुक्त जळगाव यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले असून या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आल्या आहेत. या प्रकरणामुळे पहूर परिसरात धार्मिक वर्तुळात संताप व्यक्त होत आहे.