कुऱ्हाड येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.
सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~०९/०३/२०२३
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक ०८ मार्च २०२३ बुधवार रोजी सरपंच सौ. कविता ताई प्रदिप महाजन यांनी कुऱ्हाड गावातील महिलांसाठी आरोग्याविषयी घ्यायची काळजी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी पाचोरा येथील प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ सौ. अनुजा प्रवीण देशमुख यांना आमंत्रित केले होते. यावेळी डॉ. अनुजा देशमुख यांनी उपस्थित महिलांना आरोग्याविषयी व गरोदरपणात घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले.
तसेच महिलांनी संघटित होऊन बचतगटाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन लघुउद्योग सुरु केले पाहिजे, मुलींनी चांगल्याप्रकारे शिक्षण घेऊन स्वताच्या पायावर कसे उभे रहाता येईल याकरिता प्रयत्न केले पाहिजेत तसेच मुलींच्या लग्नासाठी घाई न करता त्यांचे शिक्षण पूर्ण करुनच लग्नाचे वय झाल्याशिवाय लग्न करु नये कारण बालवयात लग्न केल्यामुळे तर विविध समस्या उभ्या रहातात व शिक्षणही अपूर्ण राहते असे मत सरपंच सौ. कविता ताई महाजन यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता भाजपच्या ज्येष्ठ नेत्या प्रभावती ताई शिंपी यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. कमल बोरसे, सौ. संगीता भगत, सौ. सुशीला पाटील, सौ. प्रतिभा मुके, सौ. सोनाली तेली, सौ. लताताई चौधरी, सौ. प्रतिभा माळी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शालेय मुलींनी स्वागत गीत, विविध नृत्य तसेच देशातील कर्तुत्वान महिलांच्या वेशभूषेत आपले अभिनय साकारले. कुऱ्हाड गाव व परिसरातील कर्तुत्वान महिला त्यात आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य परिचारिका, महिला ग्राम संघाच्या महिला व गावातील एकत्रित कुटुंब पद्धत टिकवून ठेवणाऱ्या महिलांचा देखील शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.