स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना,का विझले देशभक्तीचे धगधगणारे निखारे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना,का विझले देशभक्तीचे धगधगणारे निखारे.
संतोष पाटील
——————————————–
शेकडो वर्षाची गुलामी हजारो देश बांधवांचे बलिदान, त्याग, संघर्ष, लढा, यांचे फळ स्वातंत्र्य आणि तो सुदिन म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 वार शुक्रवार, आजचा सूर्य म्हणजे नेहमीचा सूर्य न होता आजचा वारा नेहमीचाच वारा नव्ह्ता तो या स्वतंत्र भारत देशाचा स्वतंत्र सूर्य लखलखणारे तेज घेऊन उगवलेला होता, भारतासह संपूर्ण जगाच्या वर्तमानपत्रांमध्ये भारत स्वतंत्र झाल्याच्या बातम्या छापून आल्या होत्या, देशातील जनता देशभक्तीने नाहून निघाली होती स्वातंत्र्यसंग्रामामध्ये कामी आलेले देशभक्तांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा सर्वांना अभिमान वाटत होता. २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत ‘तिरंगी ध्वज’ भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला.
तेव्हापासून ते आत्तापर्यंत हा राष्ट्रीय ध्वज सर्व भारतीय नागरिकांनी आपली अस्मिता म्हणून काळजात जपून ठेवलेला आहे ,15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून संविधान लागू झाले, 1952 ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली स्वातंत्र्य भारताचे राष्ट्रध्वज, संविधान, राष्ट्रगीत, पंतप्रधान मंत्री ,मंत्रिमंडळ तयार झाले, देश वेगाने पुढे चालला पारतंत्र्यात होरपळून निघालेली भारतीय गरीब जनता स्वातंत्र्य मिळाल्यावर सोसलेल्या, भोगलेल्या ,वेदनेला ,दुःखांना सुखाचा व समृद्धीचा लेप लावता येईल या आशेवरच बसून राहिली, मात्र तसे झाले नाही सुई न बनवणाऱ्या या देशाने सर्वच क्षेत्रांमध्ये प्रचंड अशी प्रगती केली पुढे देश प्रगती पथावर आल्यावर या देशातील धर्मपंथ राजकीय पक्ष या सर्वांनी आपापली वेगळी चूल मांडायला सुरुवात केली, अतिशय हिनपातळीचं राजकारण देश, संविधान, लोकशाही, देशहित, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून निव्वळ स्वतःची राजकीय पार्टी कार्यकर्ते याच गोष्टींचा विचार करून या लोकांनी देश चालवायला सुरुवात केली ,हे स्वातंत्र्य 75 वर्षाच झालं मात्र गरीब दुबळ्या जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेच नाही, शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले काळे कायदे जसेच्या तसे ठेवले गेले शेतकऱ्यांना या स्वातंत्र्याचा फायदा झाला नाही स्वातंत्र्य मिळालाच नाही असं म्हणण्याची वेळ आली, कितीतरी प्रश्न सोडवायचे बाकी असताना निव्वळ राजकीय पोळी शिकून घेण्यासाठी या राजकीय लोकांनी उच्छाद मांडला, आता तर देशभक्तीचा आव आणून घराघरात तिरंगा ही संकल्पना अमलात आणली, घराघरात तिरंगा काय आमच्या मनामनात तिरंगा आहे या गोष्टीचा तमाम देशवासीयांना आनंद आणि अभिमान आहे, मात्र देश अधोगतीला चालला त्याचं काय ?
मानवाला सतावणाऱ्या या खऱ्या समस्या
१. सध्याची बेरोजगारी
२. भविष्यातील प्रलयकारी बेरोजगारी
3. भयंकर आर्थिक विषमता
४. वाढत्या आरोग्य समस्या
५. प्रक्षोभक सामाजिक कृत्रिम कलह
६. हवामान बदल
७. ऊर्जा परावलंबित्व
८. बकाल शहरे
९. पाण्याचे दुर्भिक्ष
१०. वाढती लोकसंख्या
११. तंत्रज्ञानाचा गैरवापर
१२. अणूबाँम्ब
१३. मानवाच्या खाजगी आयुष्याची अखेर
१४. यंत्रमानवतेकडे झपाट्याने वाटचाल.
१५. लोकशाहीला उतरती कळा
या गोष्टींचा कोणी विचार करेल का? असो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उत्सवाच्या सर्व देशवासीयांना शुभेच्छा
बापाच्या पशिन्यानं
काळ्या वावरातला पत्थर
विरघळून गेला साहेब
मात्र
तुमच्या पत्थरदिल राजवटीला
बाप कळलाच नाही
तुम्ही सत्तेसाठीच गाताय राष्ट्र-गान
आमच्या प्रश्नान साठी कुणी पेटवलं नाही रान
हा देश,हे स्वातंत्र्य बंधुता, समता
न्याय व्यवस्था सुख-समृद्धी
यातले आमच्या वाट्याला
काही आलंच नाही
माणसा माणसात धर्मा धर्मात
तुम्ही पेटवलाय दंगा
तुमचे पाप धुवून निर्मळ वाहतेय गंगा
आमचे काय
आम्ही छाताडावर कधीच
रोवून घेतलाय तिरंगा
संतोष पाटील.
7666447112