कुऱ्हाड खुर्द येथील प्रवासी निवारा अतिक्रमणाच्या विळख्यात, प्रवासी व विद्यार्थ्यांची गैरसोय.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/१२/२०२२

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द हे गाव मोठ्या लोकसंख्येचे गाव असून येथुन जवळच कुऱ्हाड बुद्रुक तसेच सार्वे, जामने गाव आहे. या चारही गावातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना तालुका व जिल्हास्तरावर जाण्यासाठी कुऱ्हाड खुर्द येथे येऊन एस.टी. बसने पुढील प्रवास करावा लागतो. तसेच प्रवासी व विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कुऱ्हाड खुर्द येथे प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे. हा प्रवासी निवारा बांधण्यात आल्यानंतर गावातील समाजसेवकांनी दोन ते तीन वर्षं या निवाऱ्याची साफसफाई करुन हा निवारा व्यवस्थीत रीत्या ठेवला होता. म्हणून एस. टी. ने जाणारे प्रवासी व विद्यार्थ्यांची यांचा उन, वारा, पावसापासून बचाव होत होता.

परंतु आता मागील काही वर्षांपासून या प्रवासी निवाऱ्याच्या समोर व आसपासच्या परिसरात काही टपरीधारक व इतर व्यवसायिकांनी अतिक्रमण करून आपली दुकाने थाटले आहेत. यामुळे आपसूकच प्रवासी निवारा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने प्रवासी वर्ग विद्यार्थी व विद्यार्थिनींना बसण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांना ऊन, वारा, पावसात रहदारीच्या रस्त्यावर उभे राहून एस. टी. ची वाट पाहावी लागते तसेच विशेष म्हणजे या गावातून शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून मुलींची संख्या जास्त आहे. यामुळे मुलींसह, जेष्ठ नागरिक, आजारी रुग्ण, दिव्यांग प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत असल्याचे दिसून येते.

विशेष म्हणजे हा प्रवासी निवारा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने या निवाऱ्यात प्रवासी बसत नसल्याचा फायदा घेत हा निवारा दारुड्यांसाठी सोयीचा अड्डा बनला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कारण बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी व देशी दारुची खुलेआम विक्री केली जात असल्याने जवळच दारु खरेदी करुन जवळच असलेला प्रवासी निवारा व्यसनाधीन लोकांना सोयीचा ठरत असल्याचे दिसून येते म्हणून याबाबत सुज्ञ नागरिक व विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत प्रवासी निवाऱ्याच्या समोर व जवळपास असलेले संपूर्ण अतिक्रमण त्वरित काढून मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ?
गाव परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीने संबधितांना नोटीस बजावून ठरलेल्या व दिलेल्या तारखेच्या आत अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण स्वताहून काढून घेणे नियमानुसार क्रमप्राप्त ठरते. हे अतिक्रमण काढण्यासाठी कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीने प्रयत्न केला होता मात्र हे अतिक्रमण धारक आडदांड वृत्तीचे असल्याने ते कायदा किंवा पदाधिकाऱ्यांना जुमानत नसल्याची जनमानसातून खात्रीलायक माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे काही अतिक्रमण धारकांचा रोष ओढवून घेण्याची कोणीही पुढे येत नसल्याचे समजते.

ब्रेकिंग बातम्या