जामनेर, पाचोरा तालुक्यात स्वयंपाकाच्या गॅसचा काळाबाजार. गॅस ग्राहक त्रस्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/१२/२०२२
जामनेर, पाचोरा शहरासह दोघ तालुक्यात असलेल्या भारत गॅस, इंडेन गॅस, एच.पी गॅसच्या वितरक कंपनीकडून अधिकृत गॅस ग्राहकांना वेळेवर, घरपोच गॅसचे सिलेंडर मिळत नसल्याने पाचोरा, जामनेर शहरांसह तालुक्यातील गॅस ग्राहकांना अनेक अडचणी येत आहेत. यामुळे गॅस ग्राहक कमालीचे त्रस्त झाले असल्याचे दिसून येते.
तर दुसरीकडे हाच घरगुती वापरासाठी म्हणजे स्वयंपाकघरात वापरण्यासाठीच्या गॅसची काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली असता काही गॅस ग्राहक व सुज्ञ नागरिकांनी दिलेली माहिती अशी की संबंधित गॅस कंपनीकडून गॅसचा गोरखधंदा सुरु आहे. ग्रामीण भागातील गॅस ग्राहक हे स्वयंपाकाचा गॅस वापरतात परंतु यांच्या घरातील सदस्य संख्या कमी असल्याने तसेच अंघोळीला लागणारे पाणी चुलीवर तापवत असल्याने ग्राहकांना तीन ते चार महिने सिलेंडर पुरते याचाच फायदा घेत गॅस वितरक गॅस ग्राहकांच्या नावावर प्रत्येक महिन्याला किंवा २१ दिवसांनी परस्पर ऑनलाईन बुकिंग करून त्यांच्या नावाने काढलेल्या गॅस हंड्यांची काळ्या बाजारात विक्री करत आहेत.
या काळ्या बाजारात मिळणाऱ्या गॅसचा वापर हॉटेल व्यवसायीक, बेकरी तसेच स्वयंचलित वाहनांमध्ये इंधन म्हणून वापर करत आहेत. तसेच हॉटेल, उपहारगृह, लग्नसमारंभात, मोठमोठ्या मेळाव्यात किंवा इतर समारंभातील जेवनावळीच्या ठिकाणी स्वयंपाक करण्यासाठी केला जात आहे. वास्तविक पाहता व्यवसायिकांनी घरगुती वापरासाठी मिळणारा गॅस न वापरता नियमानुसार कमर्शियल गॅसचा वापर केला पाहिजे परंतु असे कमर्शियल गॅस कोणतीही व्यवसायीकांकडे दिसून येत नाही.
म्हणून गॅस ग्राहकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नसल्याने गॅस ग्राहक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने चुलीचा वापर वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. म्हणून गॅसचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे.