वावडदे गावात अवैध धंदे आबादी, आबाद, अल्पवयीन व तरुण पिढी होतेय बर्बाद.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/१०/२०२३

जळगाव तालुक्यातील वावडदे, म्हसावद परिसरातील जळके, विटनेर, रामदेव वाडी, वसंत वाडी तांडा, लमाजन, कुऱ्हाडदे, वडील, पाथरी, डोमगाव, म्हसावद या १६ खेडया गावांसह इतर ठिकाणी वाडावस्तींवर गावठी दारु, सट्टा, पत्ता, जुगार हे अवैध धंदे राजरोसपणे सुरु असल्याकारणाने गावातील अल्पवयीन, तरुण, सुशिक्षित, बेरोजगार मुलं व्यसनाधीन होतांना दिसत आहेत. तसेच याच परिसरातून मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने अवैध रीत्या वाळूची वाहतूक केली जात असून ही वाळू वाहतूक करतांना आपले वाहन सापडायला नको म्हणून अती वेगाने डंपर, ट्रक्स व ट्रॅक्टर पळवले जातात यामुळे एखाद्यावेळी या भरधाव धावणाऱ्या वाहनांच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

मागील वर्षी वावडदे येथे महिलांसाठी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यासाठी ३०० महिलांनी जोरदार निदर्शने करत सह्यांचे निवेदन देऊन वावडदे गावातील तसेच वर नमुद केलेल्या आसपासच्या गावातील सट्टा, पत्ता, जुगार, गावठी व देशी दारुची अवैध विक्री तसेच चोरट्या मार्गाने होणारी वाळूची वाहतूक थांबवण्यासाठी सर्वानुमते ठराव मंजूर करुन घेत या ग्रामसभेत घेण्यात आलेल्या ठरावाच्या प्रती मा. जिल्हाधिकारी जळगाव, मा. जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव तसेच सर्व संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे.

परंतु ग्रामसभेचा ठराव देऊन तब्बल एक वर्ष उलटले तरीही या अवैध धंदे करणारांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने राजरोसपणे अवैध धंदे सुरु आहेत. यामुळे अवैध धंदे करणारांची शिरजोर दिवसेंदिवस वाढत चालली असून कडक कारवाई केली जात नसल्याने दररोज अवैध धंदे करणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे गावागावातून अल्पवयीन मुलांसह तरुण वर्ग व जेष्ठ नागरिक व्यसनाधीन होत चालला असून हे व्यसनाधीन लोक आपल्या व्यसनपूर्तीसाठी घरातील धन, धान्य, संसारपयोगी वस्तू तसेच महिलांच्या अंगावरील दागदागिने, गळ्यात असलेल सौभाग्याच लेण मंगळसूत्र मोडून व्यसनपूर्ती करत आहेत.

यामुळे घराघरात भांडणतंटे होत असल्याने तसेच दारुडे दारु पिऊन घरात, गल्लीबोळात तसेच सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालत असल्याने गाव, गावातील शांतता भंग झाली असून या भांडणातून दररोज कित्येक संसार उध्वस्त होत आहेत. यामुळे महिलांच्या आत्महत्या, घर सोडून माहेरी निघून जाणे, घटस्फोट यात भर पडत असल्याचे पाहून वावडदे, बिलाखेड व वरील गावागावातील महिला वर्ग, समाजसेवक, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे येऊन वावडदे गावासह तक्रारी अर्जात नमूद करण्यात आलेल्या गावागावातील सट्टा, पत्ता, जुगार, गावठी व देशी दारुची अवैध विक्री तसेच वाळु माफियांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी तातडीची छोटेखानी सभा घेऊन महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार, गृहमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन वावडदे गावातील तसेच आसपासच्या आठ ते दहा गावातील सर्व प्रकारचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी साकडे घातले आहे.

“वायदे मे रहोगे तो फायदे रहोगे” कायद्याच्या रक्षकांचा नवीन फतवा.
म्हणजे नियमितपणे हप्ते द्या व काहीही करा.
——————————————————————
एका बाजूला वावडदे गावासह आसपासच्या पंधरा खेड्यापाड्यातील गावागावात, गल्लीबोळात सट्टा, पत्ता, जुगार गावठी व देशी दारुची अवैध विक्री सुरु आहे. याबाबत वारंवार आवाज उठवला तरीही आजपर्यंत ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून येत असून याबाबत दुसरीकडे अवैध धंदे करणारे व संबंधित कायद्याचे रक्षक यांची मिलीभगत असल्याने “आम्ही मारल्यासारखे करु तुम्ही रडल्यासारखे करा” अश्या पध्दतीने कारवाईचा देखावा निर्माण केला जातो अशीही माहिती काही सुज्ञ नागरिकांनी दिली आहे. तसेच “कायदे मे रहोगे तो फायदे रहोगे” म्हणजे कायद्याच्या चौकटीत रहाल तर फायद्यात रहाल असे म्हटले जात असले तरी जळगाव जिल्ह्यातील आजची परिस्थिती पाहता “वायदे मे रहोगे तो फायदे रहोगे” असा प्रकार सुरु आहे.

ब्रेकिंग बातम्या