लाख व कळमसरा शिवारात वन्य प्राण्यांची शिकार, कारवाईची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/११/२०२२
पाचोरा तालुक्यातील लाख व कळमसरा शिवारातील राखीव जंगलात ससे, रानडुक्कर व विशेष करुन हरणांची दिवसाढवळ्या छऱ्याच्या बंदुकीने शिकार केली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजकडे प्राप्त झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की राखीव जंगलासह इतर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु असल्याने राखीव जंगलासह इतर परिसरातील वनराई झपाट्याने कमी होत आहे. यामुळे ससे, रानडुक्कर, हरण, रोही (निलगाय), मोर, लांडोर व बिबट्या सारख्या जंगली प्राण्यांना जंगलात सुरक्षित ठिकाण राहीले नसल्याने हे जंगली प्राणी गावाकडे म्हणजे मानव वस्तीकडे वळले आहेत. याचेच जिवंत उदाहरण म्हणजे मागील दोन महिन्यापासून कळमसरा शिवारात बिबट्याने धिंगाणा घातला असून आत्तापर्यंत बऱ्याचशा पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे.
यात भरीत भर म्हणून लाख व कळमसरा शिवारात शिकाऱ्यांनी धुमाकूळ घातला असून हे शिकारी स्वतःच्या चार चाकी गाडीतून जंगलात घुसतात व पाणवठ्यावर थांबून किंवा प्राण्यांच्या निवाऱ्याच्या जागेचा माघ घेऊन त्या ठिकाणी छऱ्याची बंदूक वापरून दिवसाढवळ्या रानडुक्कर नीलगाय व हरणाची शिकार करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे विशेष म्हणजे हे शिकारी पाचोरा तालुक्यातीलच रहिवासी आहेत.
या बंदुकधारी शिकाऱ्यांना जंगल परिसराच्या आसपास शेती असलेल्या शेतकऱ्यांनी शिकार करण्यासाठी मज्जाव केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना दमदाटी केल्याची घटना आज दिनांक १८ नोव्हेंबर शुक्रवार रोजी लाख जंगल रस्त्यावर घडली आहे. ही घटना घडल्यानंतर शेत शिवारातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संबंधित शिकाऱ्यांना खडसावून जाब विचारला असता आम्ही जडीबुटी विकण्याचा व्यवसाय करतो म्हणून आम्ही शिकार करण्यासाठी नव्हे तर जडीबुटी शोधण्यासाठी जंगलात येत असतो असे उत्तर देत सारवासारव करण्याचा प्रयत्न करत जंगलातून काढता पाय घेतला.
परंतु जंगल परिसरातील शेतकऱ्यांनी शिकार करण्यासाठी येणाऱ्या शिकाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.