पाचोरा तालुक्यात दुधात खाद्यतेल, युरीया, सोडा, मीठ, निरमा पावडर, साखर आणि पाण्याची भेसळ जनतेच्या आरोग्याशी खेळ. भाग १.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/११/२०२२
पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्क्रीम काढलेले झीरो फॅटचे दुध, गायीचे दुध व पाणी यात खाद्यतेल, युरीया, सोडा, मीठ, निरमा पावडर व साखर या पदार्थांची मिक्सरमध्ये तासंतास भेसळ करुन दुधातील सिनिग्धता म्हणजे फॅट वाढवून हे भेसळयुक्त दूध बिनधास्तपणे विक्री होत असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजच्या हाती लागले आहे.
विशेष म्हणजे या संयोग क्रियेतून तयार होणारे दूध हे दिसायला जरी साध्या दुधासारखे असले, तरी चवीला मात्र शंकास्पद वाटते आणि अशा दुधामध्ये पौष्टिक गुणधर्म काहीही नसतात. अशा दुधाचा आरोग्यावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन भेसळ दुधाबाबत जागरूक झाले पाहिजे. कारण की अलीकडील काही वर्षांत दुधामध्ये भेसळीचे प्रमाण खूप वाढलेले दिसते. अशा प्रकारच्या दुधामध्ये विविध रसायने, पावडरी वापरल्या जातात. संयोग क्रियेतून तयार होणाऱ्या दुधामध्ये खालील घटक एकत्रित वापरले जातात.
यात सोडा, युरिया, खाद्योपयोगी तेल, स्निग्धांशविरहित दूध, मीठ, निरमा पावडर, साखर, साबण चुरा आणि पाणी हे घातक पदार्थ वापरले जातात कारण खाद्यतेल हे स्निग्धता वाढविण्यासाठी वापरले जाते अशा प्रकारचे दूध हे गावपातळीवरील दूध संकलन केंद्रातील चाचण्यांमध्ये पास होते. कारण या ठिकाणी फक्त स्निग्धांश आणि स्निग्धांशविरहित घटकच पाहिले जातात, पण अशा प्रकारचे दूध हे शरीरास खूप हानिकारक असते. संयोग क्रियेतून तयार होणारे दूध आणि नैसर्गिक दूध यांमधील फरक ओळखणे हे सर्वसामान्य माणसाला सहजासहजी शक्य नसल्याने व या भेसळीकडे अन्न व औषध प्रशासनाचे व इतर जबाबदार घटकांचे काही ठिकाणी अर्थपूर्ण तर काही ठिकाणी गलथान कारभारामुळे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने हा भेसळयुक्त दूधाचा गोरखधंदा बिनधास्तपणे सुरु असल्याचे बोलले जात आहे.
परंतु संयोग क्रियेतून तयार होणारे दूध हे दिसायला जरी साध्या दुधासारखे असले तरी चवीला मात्र शंकास्पद वाटते आणि अशा दुधामध्ये पौष्टिक गुणधर्म काहीही नसतात (नैसर्गिक दुधाच्या तुलनेत). भारतीय औषध प्रमाणित संस्थेनुसार अशा भेसळयुक्त पदार्थांमुळे मानवास कॅन्सरसारखे रोग होऊ शकतात. युरियाच्या अतिवापरामुळे, सेवनामुळे मूत्रविकारही जडू शकतात. त्याचप्रमाणे हृदयास व फुफ्फुसासही हानिकारक ठरू शकते. सोड्याच्या अतिसेवनामुळे लहान मुलांमध्ये वाढीस असणारे प्रथिनांचे (लायसीन) प्रमाण कमी होते, यामुळे शरीरवाढीवर विपरीत परिणाम होतात. म्हणून दुधात होणारी भेसळ त्वरित थांबवून भेसळयुक्त दूधाची निर्मीती व विक्री करणाऱ्यांवर कठोरात, कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.