पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची दारु अड्ड्यावर धडक कारवाई दिड लाख रुपयांचे रसायन नष्ट.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०६/२०२१
पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सौ. निताजी कायटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दिनांक २४ जून गुरुवार रोजी पिंपळगाव हरेश्वर पासून जवळच असलेल्या शिंदाड शिवारातील गावठी दारु निर्मीतीच्या अड्ड्यावर आपल्या सहकाऱ्यांसह थेट धाड टाकून जवळपास दिडलाख रुपये किंमतीचे रसायन नष्ट केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पिंपळगाव हरेश्वर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सहाय्यक पोलिस निरीक्षक सौ.निताजी कायटे यांनी पोलिस हेड कॉन्स्टेबल मा.श्री. रणजीत पाटील, मा.श्री.पोलिस नाईक मा.श्री. रवी पाटील, पोलिस नाईक मा.श्री. अरुण पाटील,पो.नाईक मा.श्री. सचिन वाघ व होमगार्ड यांना सोबत घेऊन शिंदाड शिवारातील धरणाजवळ सार्वजनिक जागी सुरु असलेल्या गावठी दारु निर्मिती अड्ड्यावर धाड टाकून ६००००/०० किंमतीचे कच्चे रसायन, २००००/०० रुपये किंमतीचे पक्के उकळते रसायन व २१००/०० रुपये किंमतीची ३५ लिटर गावठी हातभट्टीची दारु असे ८२१०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करत आरोपी हैदर सिकंदर तडवी वय वर्षे (५४) याला ताब्यात घेत पोलिस नाईक अरुण सुभाष राजपूत यांच्या फिर्यादीवरून दारुबंदी अधिनियम ६५ फ,ब,क,ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तसेच शिंदाड शिवारातील मनोज कासम तडवी वय वर्षे (५५) व सचिन मनोज तडवी वय वर्षे २४ राहाणार शिंदाड यांच्या शेताच्या बांधावर सुरु असलेल्या हातभट्टीच्या अड्ड्यावर धाड टाकून ५५०००/०० हजार रुपये किंमतीचे कच्चे रसायन, २००००/०० रुपये किंमतीचे उकळते रसायन व १८००/०० रुपये किंमतीची ३० लिटर दारु असा ७६८००/०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट करत पोलिस नाईक मुकेश पांडुरंग लोकरे यांच्या फिर्यादीवरून दारुबंदी अधिनियम ६५ फ,ब,क,ई प्रमाणे रितसर गुन्हा दाखल केला आहे.
या धडक कारवाई बद्दल पंचक्रोशीतील जनतेतून समाधान व्यक्त केले जात असून अशीच कारवाई करुन शिंदाड गावपरिसरातील गावठी व देशी दारु कायमस्वरूपी हद्दपार करावी अशी मागणी होत आहे.तसेच आज आमचा वटपौर्णिमेचा उपवास आम्हाला पावला असल्याचे मत अनेक त्रस्त महिलांनी व्यक्त केले.