दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/१०/२०२२

महाराष्ट्र राज्यात शिंदे गटाने बंडखोरी करत फडणवीसांच्या इशाऱ्यावर भाजपाशी हातमिळवणी करुन सरकार स्थापन केल्यापासून जनहितार्थ क्षणाचाही विलंब न करता कधी (चालते विमान थांबवून) तर कधी, कधी कोणतेही आयोजन, नियोजन नसतांना जनतेच्या हितासाठी महाराष्ट्रात दररोज नवनवीन सोयी, सुविधा व सवलती देण्यासाठी घोषणांचा व आश्वासनांचा पाऊस पाडत आहे. अशीच एक घोषणा पुढे दिवाळीच्या सणानिमित्त राज्यातील शिंदे सरकारने करुन महाराष्ट्रातील जनतेची दिवाळी गोड व्हावी म्हणून शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून १००/०० रुपयात आनंदाचा शिधा वाटप करण्याची घोषणा करुन दिवाळीच्या सणाच्या अगोदर गरजुंपर्यंत पोहचवण्यासाठी आदेश दिले होते.

(बऱ्याचशा स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधा वाटप करतांना काळाबाजार होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.)

या आनंदाच्या शिधा वाटपात अवघ्या शंभर रुपयांत १ किलो खाद्यतेल, १ किलो साखर, १ किलो चणाडाळ आणि १ किलो रवा असे वाटप करण्याचे ठरविण्यात आले होते. परंतु सरकारची ही घोषणा व योजना फसवी असल्याचे आरोप सर्वसामान्य व गोरगरिब जनतेने केले आहेत. कारण बऱ्याचशा रेशन दुकानातून कुठे साखर तर रवा गायब झाला असुन आनंदाचा शिधा वाटपातील चार वस्तूंचे वाटप बोटावर मोजण्याइतकी स्वस्त धान्य दुकाने वगळता जवळपास नव्वद टक्के दुकानातून फक्त दोन किंवा एकच वस्तू देऊन चक्क शंभर रुपये वसूल करण्यात आले आहेत. हा प्रकार व ही घोषणा म्हणजे शिंदे सरकारने गरिबांची थट्टा केल्याच्या संतप्त भावना जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत.

“सरकारचा उतावीळ पणा भोवला”

महाराष्ट्र राज्य सरकारने म्हणजेच शिंदे सरकारने राज्यातील सर्व गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून आनंदाचा शिधा वाटपाची घोषणा करत यात १ किलो खाद्यतेल, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ व १ किलो साखर अवघ्या शंभर रुपयात देण्याची देण्याचे जाहीर केले होते. याचा फायदा राज्यातील एक कोटी सत्तर लाख रेशनकार्ड धारकांना होणार होता. परंतु राज्य सरकारने जेव्हा ही घोषणा केली तेव्हा दिवाळीचा सण हा अवघ्या आठच दिवसांवर येऊन ठेपला होता.

एका बाजूला एक कोटी सत्तर लाख शिधा पत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वाटपासाठी खाद्यतेल, रवा, चणाडाळ व साखर तडकाफडकी उपलब्ध करुन या चारही वस्तूंची प्रत्येकी एक किलो वजनाची पाकिटे बनवून दिवाळी सणाच्या अगोदर महाराष्ट्रातील सर्व स्वस्त धान्य दुकानात पोहच करणे गरजेचे होते व चारही वस्तूंची खरेदी करुन पाकिटे तयार करुन म्हणजे एकुण सहा कोटी ८० लाख पाकिटे महाराष्ट्रातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या दुकानात दिवाळी सणाच्या अगोदर पोहचवण्यासाठीचा कालावधी किमान विस दिवस अगोदर पाहिजे होता.

परंतु याचा कोणताही सारासार विचार न करता आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मागील काळात (विमान थांबवून तडकाफडकी जसा एक आदेश दिला होता) तसाच आदेश दिवाळीचा सण काही दिवसांवर असतांनाच आनंदाचा शिधा वाटप करण्यासाठी दिल्यामुळे सगळीकडे दिवाळीच्या सणानिमित्त फक्त आणि फक्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा मिळणार म्हणून आनंदी आनंद दिसून येत होता मात्र स्वस्त धान्य दुकानातून गोडेतेल, रवा, चणाडाळ व साखर या चारही वस्तूंचा वेळेवर पुरवठा न मिळाल्यामुळे काही ठिकाणी साखर तर काही ठिकाणी तेल वाटपासाठी उपलब्ध नसल्याने स्वस्त धान्य दुकानदार व रेशनकार्ड धारकांमध्ये भांडणतंटे होऊन काही ठिकाणी हाणामारी झाल्याचे खात्रीलायक वृत्त असून ही बाब पुरवठा विभागासाठी डोकेदुखीच ठरणार आहे यात शंका नाही.