निपाणे येथील घटनेप्रकरणी गावगुंडांना अटक करा, या मागणीसाठी आज पाचोरा येथे पॅंथर सेनेचा मोर्चा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/१०/२०२२
पाचोरा तालुक्यातील निपाणे येथे दिनांक १२ सप्टेंबर सोमवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका दलित समाजाच्या मृत महिलेचा अंत्यविधी गावातील स्मशानभूमीमध्ये होवु देण्यास माजी जिल्हापरिषद सदस्य तथा शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांचेसह १० जणांनी मज्जाव केल्याची घटना घडली होती. दरम्यान दिनांक १४ सप्टेंबर बुधवार रोजी रावसाहेब पाटील यांचेसह १० जणांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये जातीवाचक शिविगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आज जवळपास २० दिवस उलटुनही संशयित आरोपींना अटक करण्यात आली नसुन आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी मागणीसाठी तसेच चार, चार वेळा तालुका व जिल्हास्तरावर मोर्चे, आंदोलन करुन सुध्दा प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने प्रशासन हे कुणाच्यातरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत आरोपींना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पॅंथर सेना जळगाव जिल्हा युनिट तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांच्या उपस्थितीत आज दिनांक ०३ ऑक्टोबर सोमवार रोजी पाचोरा येथे दुपारी १२ वाजता जारगाव चौफुली पासून तहसील कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पॅंथर सेना जळगाव जिल्हा युनिट व राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांनी केले आहे.