जळगाव जिल्ह्यातील लाकूड मध्यप्रदेश कडे रवाना लाकूड व्यापाऱ्यांचा धुमाकूळ वनविभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष, शेतकरी व व्यापाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०४/२०२१
(एका बाजूला जळगाव जिल्ह्यात अंत्यविधीसाठी लाकडांची उणीव भासत असतांनाच दुसरीकडे लाकडाची परराज्यात तस्करी)
(दिवसाढवळ्या होत असलेली वृक्षतोड व यात मलिदा खाऊन मदत करणारे वनविभागाचे कर्मचारी, अधिकारी यांचा लवकरच भांडाफोड पुढील आठवड्यात तसेच)
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व जामनेर तालुक्यात लाकूड व्यापाऱ्यांनी हैदोस घातला असून दररोज शेकडो झाडांची कत्तल केली जात आहे. या कत्तलीकडे वनविभाग मुद्दामून डोळेझाक करत असल्याचा आरोप निसर्गप्रेमी जनतेतून केला जात आहे.
एका बाजूला शासन-प्रशासन वृक्ष लावा वृक्ष जगवा यासाठी विविध उपक्रम राबवत असताना दुसरीकडे मात्र वीरप्पन ची पिलावळ दिवसाढवळ्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल करून ते लाकूड एका ट्रकमध्ये भरून मध्यप्रदेश कडे रवाना करत असल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे हा लाकूड कापण्याचा व वाहून नेण्याचा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असून संबंधित जबाबदार अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने वृक्ष प्रेमी व वन प्रेमींनी संतप्त भावना व्यक्त केल्या असून जर वृक्षतोड अशीच सुरू राहिली तर भविष्यात जामनेर व पाचोरा तालुका नक्कीच बोडका होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब, वनविभागाचे संबंधित अधिकारी तसेच इतर लोकप्रतिनिधी यांनी या बाबीकडे लक्ष देऊन हिरव्या गार झाडांची होणारी कत्तल थांबवावी अन्यथा भविष्यात वातावरणातील घडणाऱ्या बदलांमुळे खूप मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
{वृक्षतोड न थांबल्यास भविष्यात वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाणात झपाट्याने कमी होऊन ऑक्सिजन शिवाय भररस्त्यात तडफडून मरण्याची वेळ आपल्यावर येईल हे नक्कीच.}