गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०७/२०२३
पिंपळगाव हरेश्वर येथील हॉटेल निसर्ग जवळ गुरांची वाहतूक करणाऱ्या दोघा विरुद्ध पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉस्टेबल दिपक सदाशिव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक २१ जूलै २०२३ शुक्रवार रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास एक छोटा हत्ती मालवाहतूक करणाऱ्या गाडीतून दोन बैल दाटीवाटीने दोरखंड बांधून निर्दयपणे वाहतूक करतांना एका गोरक्षकाला आढळून आले होते. संबंधित गोरक्षकाने गाडी थांबवून सदरची घटना पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला कळवली व या पशुधनाची सुटका करण्यासाठी सांगितले.
ही माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री महेंद्रजी वाघमारे यांनी पोलीस कॉन्स्टेबल दिपक सोनवणे यांना घटनास्थळी जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेत खात्री करण्यासाठी पाठवले असता पोलीस कॉन्स्टेबल दिपक सोनवणे यांनी लगेचच पिंपळगाव हरेश्वर रस्त्यावर असलेल्या निसर्ग हॉटेल जवळ जाऊन खात्री केली असता एक महेंद्र कंपनीच्या गाडी क्रमांक एम. एच. २० ई. सी. १८२५ गाडी व गाडी जवळ किरण गरुड व पाच ते सहा लोकांची गर्दी दिसून आली तेथे जाऊन अधिक चौकशी केली असता सदरील गाडीमध्ये पुरेशी जागा नसतांना दोन बैल दाटीवाटीने भरुन दोरखंड बांधून निर्दयीपणे वाहतूक करतांना आढळून आले.
याबाबत किरण गरुड इतर लोकांसमोर संबंधित गाडी मालकाला विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव मुक्तार खान सलिम खान वय १८ वर्षं राहणार पिंपळगाव हरेश्वर असे सांगितले या बाबत अधिक माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला व बारकाईने विचारपूस केली असता संबंधिताजवळ गाडीची कागदपत्रे, गुरे वाहतूक करण्यासाठी लागणारा परवाना तसेच गुरे खरेदी केल्याची कोणत्याही प्रकारची कागदपत्रे किंवा खरेदी पावत्या आढळून न आल्यामुळे संबंधित गाडी चालवत असलेल्या मुक्तार खान सोबत असलेल्या भिकन शब्बीर तडवी यास ताब्यात घेऊन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला आणून संशयित आरोपी मुक्तार खान सलीम खान राहणार पिपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा व भिकन शब्बीर तडवी राहणार बहुलखेडा तालुका सोयगांव यांचे विरुध्द प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमन १९६० चे कलम ११ (१) (डी) ११ (१) (एफ). महाराष्ट्र पोलीस अधीनियम १९५१ कलम ११९, महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५ ऐ. (१). ९, प्राण्याचे परीवहन नियम १९७८ चे कलम ४७, ४८, ४९ मोटार अधिनियमन १९८८ चे कलम ८३, १७७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून गाडीत असलेला गावरान जातीचा लालसर रंगाचा लहान शिंगे असलेला अंदाजे ५००००/०० रुपये किंमतीचा एक व पांढऱ्या रंगाचा माळवी जातीचा लहान शिंगे असलेला अंदाजे ५००००/०० बैल तसेच एक महेंद्र कंपनीची गाडी क्रमांक एम. एच. २० ई. सी. १८२५ अंदाजे किंमत ६००००/०० ही जप्त करण्यात आली आहे.