गावठी डुकरांचा होत नाही बंदोबस्त,वाटसरुंचा जिव झाला स्वस्त.आतातरी पोलीस कारवाई करतील का ?
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०८/२०२२
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी व अंबे वडगाव गावात गावठी डुकरांची संख्या हजारोंच्या वर गेली असून डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा म्हणून भोकरी व अंबे वडगाव येथील ग्रामस्थांच्या तक्रारीवरून दोघह गावच्या ग्रामपंचायतीने गावठी डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी डुकरांचा संबंधित मालक याला वारंवार तोंडी व लेखी स्वरूपात सुचना (नोटीस) देऊन सुद्धा संबंधित डुकरांच्या मालकाने डुकरांचा बंदोबस्त न केल्यामुळे भोकरी व अंबे वडगाव ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव करुन संबंधित डुकरांच्या मालकावर रीतसर कारवाई करण्यासाठी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केल्या आहेत. तरीही संबंधित डुकरांचे मालक ग्रामपंचायतीची मस्तावले असून पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला बोलावल्यावर सुध्दा ते हजर होत नसल्याने भोकरी व अंबे वडगावच्या नागरिकांना अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागत आहे.
विशेष म्हणजे वरखेडी येथून जवळच असलेले भोकरी व अंबे वडगाव ही गावे पाचोरा, जामनेर रस्त्यालगत असल्याने व या रस्त्यावर वाहानांची वर्दळ जास्त आहे. त्यातच ही गावठी डुकरे मोठ्या संख्येने दिवसभर या रहदारीच्या रस्त्यावर येऊन धिंगाणा घालत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होतो. व दररोज लहानमोठे अपघात होत असून दुचाकीस्वारांच्या जिवावर बेतत आहे. यात आजपर्यंत बऱ्याचशा दुचाकीवरून जाणाऱ्या वाटसरुंच्या गाडीला डुक्कर धडकल्याने अपघात होऊन काहींचे हात, पाय फॅक्चर झाले असून काहींच्या डोक्याला व इतर अवयवांना जबर दुखापत झाल्याने त्यांना हजारो रुपये दवाखान्याचा खर्च करावा लागला आहे.
मागील दोन दिवसांपूर्वी भातखंडे खुर्द येथील रहिवासी विशाल गजानन कुमावत वय (२८) वर्षे हे पाचोरा येथुन पहूर येथील नातेवाईकांकडे जात असतांनाच वरखेडी भोकरी येथील रेल्वे फाटका जवळ त्यांच्या दुचाकी समोर अचानकपणे गावठी डुक्कर येऊन धडकल्याने त्यांच्या गाडीला जोरदार अपघात होऊन या अपघातात त्यांच्या उजव्या हाताचा अस्थिभंग ते जागेवरच बेशुद्ध होऊन पडले परंतु भोकरी येथील ग्रामस्थांनी त्यांना तातडीने पाचोरा येथील डॉ. प्रशांत पाटील यांच्या सुधन हॉस्पिटलमध्ये नेऊन त्वरित उपचार केल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. अजूनही वेळ गेलेली नसून या डुकरांच्या मालकावर वेळीच रीतसर कारवाई करुन गावठी डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी भोकरी व अंबे वडगाव येथील ग्रामपंचायतीने ठरावाव्दारे केली आहे.