वरखेडी बाजारपेठेत खड्डेच खड्डे व चिखलाचे साम्राज्य.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०८/२०२२
पाचोरा तालुक्यातील वरखेडी हे गाव मोठ्या बाजारपेठेचे गाव असून या गावात प्रत्येक गुरुवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारपेठेत जैन स्थानक ते सिध्दी कलेक्शन तसेच गुरुदत्त मेडीकल ते राममंदिर पर्यंतच्या परिसरात वेगवेगळ्या व्यवसायाची दुकाने असून याच परिसरात आठवडे बाजाराच्या दिवशी भाजीपाला, किराणा दुकान, हॉटेल, रेडीमेड कापड दुकान, कटलरी व इतर सर्वप्रकारचे व्यावसायीक आपली दुकाने लावतात.
परंतु जैन स्थानक ते सिध्दी कलेक्शन तसेच राममंदिरापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या परिसरात पावसाच्या पाण्याने मोठमोठे डबके साचले असून मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. तसेच दोन दिवसावर पोळा सण येऊन ठेपला असल्याने याच बाजारपेठेत पोळा भरतो व पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बाण पटांगणावर बारागड्या ओढल्या जातात परंतु यावर्षी गुरुदत्त मेडीकल ते राममंदिर पर्यंतच्या परिसरात खड्डेच, खड्डे पडले असून मोठमोठे पाण्याचे डबके व चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. म्हणून येत्या दोन दिवसात वरखेडी ग्रामपंचायतीने या परिसरातील खड्डे त्वरित बुजवून चिखलमय परिसरात त्वरित मुरुम टाकावा अशी मागणी जोर धरत आहे.
पोळा सणाच्या अगोदर मुरुम टाकल्यास बैलपोळा व बारा गाड्या ओढण्यासाठी कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची वरखेडी ग्रामपंचायतीने काळजी घ्यावी अशी सुज्ञ नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.