दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/१०/२०२३

काल दिनांक २ ऑक्टोंबर २०२३ सोमवार रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आखतवाडे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामसेवक, तरुण युवक, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष, रोजगार सेवक ग्रामपंचायत पंचायत शिपाई, कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने गावात स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यात आले.

या निमित्ताने काल सकाळी साडेआठ वाजता ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जवळ सर्वांनी एकत्र जमून प्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर श्री. सुनील गवळी सर यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर सगळ्यांनी हातात खराटे घेऊन गावातील गल्लीबोळात फिरुन साफसफाई करत सर्व कचरा ट्रॅक्टर मध्ये भरुन गावाबाहेर नेऊन नष्ट केला.

यानंतर सर्वांनी ग्रामपंचायतीच्या समोर येऊन स्वच्छता अभियानाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी श्री. गवळी सर यांनी डेंगू ह्या आजारावर कश्या प्रमाणे उपाययोजना व प्रतिबंध आणता येईल या बाबत मार्गदर्शन केले. तसेच जिल्हापरिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रितेश वाणी यांनी सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांना बालविवाहाचे तोटे समजून सांगत गाव परिसरात कोणीही बालविवाह करु नये व कोणीही बालविवाह करण्याचा प्रयत्न केला तर सर्वांनी मिळून बालविकास विरोध करावा असे आवाहन केले. या मोहिमेत स्वामी विवेकानंद अभ्यासिका, फैजाने रजा फौंडेशन ग्रुप आखतवाडे, आखतवाडे उपकेंद्रातील सर्व कर्मचारी, जिल्हापरिषद मराठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मित्र, जिल्हापरिषद उर्दू शाळेतील शिक्षक व विद्यार्थी, महाराणा प्रताप मित्र मंडळ, शिवशक्ती मित्र मंडळ, शिवगर्जना मित्र मंडळ, शौर्य गणेश मित्र मंडळ, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विठाई गृह उद्योग महिला बचत गट, महावितरण कर्मचारी आखतवाडे (कक्ष नेरी), संघर्ष मित्र मंडळ, पशु चिकित्सा कर्मचारी आखतवाडे, महात्मा गांधी तंटामुक्त समिती व पोलीस पाटील आखतवाडे यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्व गावकऱ्यांनी भाग घेऊन सहकार्य केल्याबद्दल उपसरपंच दिपक गढरी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.